रेसिंग बनले कमाईचे साधन
By Admin | Updated: January 1, 2017 01:43 IST2017-01-01T01:43:50+5:302017-01-01T01:43:50+5:30
वेगाच्या नशेसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या बाइकवेड्या तरुण-तरुणींची बाइक रेसिंगची क्रेझ कॅश करण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीत हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, राजकीय नेते

रेसिंग बनले कमाईचे साधन
(येथे लागते मृत्यूशी पैज - भाग-२)
- मनीषा म्हात्रे, मुंबई
वेगाच्या नशेसाठी जिवाची बाजी लावणाऱ्या बाइकवेड्या तरुण-तरुणींची बाइक रेसिंगची क्रेझ कॅश करण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीत हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि बड्या मोबाइल कंपन्यांचे मालक अवैधरीत्या बाइक रेसिंगचे आयोजन करत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर मध्यरात्रीनंतर होणाऱ्या बाइक रेसिंगसाठी कोट्यवधी रुपयांचा सट्टाही लावण्यात येत आहे. जिवावर उदार होऊन, मुंबईत सुरू असलेल्या रेसिंगवर सध्या बेटिंग सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, पोलिसांच्या मुलांचीही या रेसिंगमध्ये एक वेगळी टीम आहे.
मुंबईच्या वरळी सी लिंक, विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग, पेडर रोड, वांद्रे रिक्लेमेशन सेंटर ही ठिकाणे सध्या रेसिंग पॉइंट झाले आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतून आलेली तरुणाई हाजीअली अथवा नरिमन पॉइंट येथे एकत्र येतात. गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री साडे बारा ते पहाटेपर्यंत त्यांचा खेळ सुरू असतो. १ किमीपासून ते ७ किमीपर्यंतच्या अंतरात रेसिंग होते. नाकाबंदी, पोलीस बंदोबस्त याची माहिती ते आधीच घेऊन असतात आणि सुरू होतो, तो रेसिंगचा जीवघेणा थरार.
येथे अनेकांना आपल्यामागे बेटिंग सुरू आहे, याबाबत माहितीच नसते. राजकीय नेते, अभिनेते आणि काही बड्या मोबाइल कंपन्यांचे मालक हौसेपोटी त्यांच्या रेसिंगवर बेटिंग लावत असल्याची माहिती रायडर्सने दिली.
हजार रुपयांपासून कोट्यवधींमध्ये याचा खेळ रंगतो आहे. एका रेसिंगमागे २० ते २२ लाख लावले जात आहे. कुठल्याही प्रकारची काळजी न घेता, तरुणाई यामध्ये उतरते. यात धक्कादायक बाब म्हणजे, या ग्रुपमध्ये पोलिसांची मुलेही कमी नाही. कुठल्या गुन्ह्यांत अडकलेच तर वडिलांमुळे त्यांची सुटका होते. तर कुठे नाकाबंदी दिसल्यास रायडर्स चुकीच्या दिशेने मागे फिरतात आणि अपघातांना बळी ठरतात. त्यामुळे यांना निर्बंध कुणाचे? असा प्रश्न येथे समोर येत आहे.
प्रकार
३६० डिग्री - या प्रकारात रायडर रेसिंग बाइक हवेत तीन वेळा फिरवतो. या सर्व प्रकरांमध्ये ही रेसिंग सर्वात जीवघेणी ठरते.
फ्रंट व्हीली स्टंट - बाइकच्या पुढच्या चाकावर गाडी चालवून स्टंट मारणे, जवळपास २ ते ३ किमी अंतर हे पुढच्या चाकावर नेण्यात येते.
स्टॉपी व्हीली स्टंट - बाइकच्या मागच्या चाकावर गाडी चालवून स्टंट करणे
९० डिग्री - बाइक ९० डिग्रीला सरकवत जमिनीला घर्षण करत चालविली जाते. या दरम्यान निघणारा स्पार्कसाठी हे रायडर्स वेडे असताता. मात्र, यातूनच अनेकदा बाइक एकमेकांवर घसरते.
१८० डिग्री - या स्टेजला बाइकवर बसलेल्या रायडर्सची सीटची बाजू पूर्णपणे जमिनीकडे झोकवून दिली जाते.