ऐरोली मतदारसंघात युतीमध्येच रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:10 PM2019-08-26T23:10:12+5:302019-08-26T23:11:22+5:30

आघाडीमध्ये उमेदवाराचा शोध : विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे बदलली समीकरणे

race in coalition for Airoli constituency | ऐरोली मतदारसंघात युतीमध्येच रस्सीखेच

ऐरोली मतदारसंघात युतीमध्येच रस्सीखेच

Next

- नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिलेल्या ऐरोली मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असून युतीच्या निर्णयावरच येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. युतीमध्ये चुरस असताना काँगे्रस व राष्ट्रवादी मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये ऐरोली मतदारसंघाची निर्मिती झाली. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर संदीप नाईक या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. गत पाच वर्षांमध्ये सातत्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलत राहिली आहेत. २०१५ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली. भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवकही या मतदारसंघात निवडून आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन कामगार वर्गाला भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधान परिषदेचे सदस्यपद देण्यात आले. शिवसेनेचे विजय चौगुले यांना वराड समाज समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांना या मतदारसंघातून जवळपास ४४ हजार मतांची आघाडी मिळाली. या आघाडीमुळे युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदार संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघातील सर्व समीकरणेच बदलून गेली आहेत.
नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितीही वाढली आहे. परंतु त्या तुलनेमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवारांमध्ये फारशी चुरस दिसत नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता फक्त दोन नगरसेवक उरले आहेत.

यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. आघाडी झाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याने काँग्रेसने अद्याप फारशी मोर्चेबांधणी सुरू केलेली नाही. युती होणार की नाही यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत. युती झाली तर हा मतदारसंघ भाजपकडे जाऊन संदीप नाईक उमेदवार असतील. युती झाली नाही तर शिवसेनेकडून महापालिकेमधील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम. के. मढवी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या रमाकांत म्हात्रे यांचेही नाव चर्चेत आहे.

राजकीय उलथापालथ
ऐरोली मतदारसंघात पाच वर्षे सातत्याने राजकीय बदल घडत आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपची फारशी संघटनात्मक बांधणी या मतदारसंघात नव्हती. पक्षाचे फक्त दोन नगरसेवक होते. परंतु सद्यस्थितीमध्ये विद्यमान आमदार भाजपमध्ये आले आहेत. भाजपचे विधान परिषद सदस्य रमेश पाटील याच मतदारसंघात वास्तव्यास आहेत. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचीही संघटनात्मक ताकद या मतदारसंघात आहे. यामुळे युतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान आमदार व पदाधिकारी भाजपत गेल्यामुळे राष्ट्रवादीची स्थिती बिकट झाली आहे. सद्यस्थितीमध्ये दोन नगरसेवक एवढीच त्यांची ताकद असून काँगे्रसचे या मतदारसंघात ३ नगरसेवक आहेत. दहा वर्षे या मतदारसंघात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला सक्षम उमेदवार शोधावा लागत आहे.

मागोवा मागील निवडणुकीचा
ऐरोली मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार संदीप नाईक यांना ७६,४४४ मते मिळाली होती. शिवसेनेचे विजय चौगुले यांना ६७ हजार ७१९ मते मिळाली व भाजपचे उमेदवार वैभव नाईक यांना ४६ हजार ४०५ मते मिळाली होती. ८७२५ मतांनी संदीप नाईक विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून ४४ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.

Web Title: race in coalition for Airoli constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.