रब्बीवर अवकाळी
By Admin | Updated: February 12, 2015 03:24 IST2015-02-12T03:24:27+5:302015-02-12T03:24:27+5:30
राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला असून खान्देश, अकोला, अमरावतीत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रब्बीवर अवकाळी
मुंबई : राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला असून खान्देश, अकोला, अमरावतीत रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
खान्देशात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ज्वारी व गहू आडवा झाला. जळगाव जिल्ह्यात या दोन्ही पिकांचे ३० ते ३५ टक्के नुकसान होण्याची भीती आहे. तर हरभऱ्यामध्ये घाटेअळी, तुडतुडे पडण्याची शक्यता आहे. पावसाने कापसाची बोंडे काळवंडली आहेत. जिल्ह्यात चार लाख ६२ हजार हेक्टरवर कापूस आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या तडाख्याने गहू व ज्वारी आडवी झाली आहे. यंदा हरभऱ्याचे क्षेत्र थंडी व ओलाव्यामुळे वाढले. मात्र पावसामुळे घाटेअळी फोफावेल. कृषि विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
धुळे जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या गारपीटचा तडाखा साक्री आणि धुळे तालुक्याला अधिक बसला आहे. गहू, मका, डाळींब, द्राक्ष, मिरची, टमाटे, ऊस व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.
विदर्भात अमरावती व अकोला जिल्ह्याला पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यात मंगळवारी रात्री वादळवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू जमीनदोस्त झाला. संत्र्याचा आंबिया बहार गळाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. आंब्याचा मोहोरही झडला. अकोला जिल्ह्याच्या काही भागात गाराही पडल्याने हरभरा, गहू, आंब्याचे नुकसान झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)