आर. आर. आबा अनंतात विलीन
By Admin | Updated: February 18, 2015 02:54 IST2015-02-18T02:54:10+5:302015-02-18T02:54:10+5:30
सर्वांचे लाडके आबा अर्थात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांना लाखोंच्या संख्येने जमलेल्या शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.

आर. आर. आबा अनंतात विलीन
अंजनीत अंत्यसंस्कार : अंत्यदर्शनासाठी जनसागर
सांगली : सर्वांचे लाडके आबा अर्थात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांना लाखोंच्या संख्येने जमलेल्या शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या जन्मगावी अंजनी (ता. तासगाव) येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कर्करोगाच्या आजाराने रावसाहेब रामराव (आर. आर.) पाटील यांचे सोमवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. आज सकाळी पावणेआठ वाजता रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव तासगावात आणण्यात आले. तासगावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. त्यानंतर अंजनी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव नेण्यात आले. अंजनी गावासह परिसरावर शोककळा पसरली होती.
दुपारी पावणेदोन वाजता पोलीस पथकाने आर. आर. पाटील यांना अखेरची सलामी व मानवंदना दिली. आबांचा मुलगा रोहित, कन्या स्मिता आणि प्रियंका यांनी दुपारी दोन वाजता भडाग्नी दिला. उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘अमर रहे अमर रहे, आर. आर. आबा अमर रहे’ अशा घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह मंत्रिमंडळातील विनोद तावडे, दिवाकर रावते, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आदी सदस्य तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, जयंत पाटील, नारायण राणे यांच्यासह आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्या अस्थिविसर्जन
आबांंच्या अखेरच्या इच्छेनुसार दहाव्या आणि बाराव्याच्या सर्व विधींना फाटा देऊन गुरुवारी अस्थिविसर्जन आणि इतर कार्यक्रम होणार असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले. गुरुवारी (दि. १९) सकाळी दहा वाजता अंजनी येथे अस्थिविसर्जन होणार आहे.
चूल पेटली नाही !
आबांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अंजनीसह परिसरावर शोककळा पसरली. परिसरातील अनेक गावांत चूल पेटली नाही. आऱ आऱ पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातील गावेच्या गावे लोटली होती. विशेषत: महिला मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या.