अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न चिघळला
By Admin | Updated: November 25, 2014 01:54 IST2014-11-25T01:54:07+5:302014-11-25T01:54:07+5:30
अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांसोबत शिक्षकमंत्र्यांनी बोलावलेली बैठक केवळ चर्चेचा फार्स ठरली.
अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न चिघळला
मुंबई : अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांसोबत शिक्षकमंत्र्यांनी बोलावलेली बैठक केवळ चर्चेचा फार्स ठरली. शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावरून घूमजाव केल्याने शिक्षक भारती आणि शिक्षक परिषद या संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
शाळांच्या संच मान्यतेमुळे निर्माण झालेल्या हजारो अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व संघटनांची बैठक आयोजित केली होती. ही बैठक निष्फळ ठरल्याने शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत. विशेष अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी संच मान्यतेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढील दोन दिवसांत संच मान्यतेला स्थगिती देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु या बैठकीत याबाबतचा निर्णय न झाल्याने शिक्षणमंत्र्यांच्या या घूमजाव भूमिकेचा निषेध करण्यासाठी येत्या शनिवारपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.
या विषयावर शिक्षक भारतीने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता शिक्षक भारतीच्या परळ येथील कार्यालयात आयोजित केली आहे. या संघटनेसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही 27 नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन होणार असून, त्यात शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक सहभागी होणार आहेत.
कृती समितीचे आज आंदोलन : शिक्षण विभागाने शाळांचे फेरमूल्यांकन सुरू करण्याचा घाट घातला आहे. याविरोधात महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील शिक्षक सहभागी होणार आहेत.