अडचणीचे प्रश्न विचारल्याने माझ्या हेतूंविषयी शंका
By Admin | Updated: September 24, 2015 01:27 IST2015-09-24T01:27:59+5:302015-09-24T01:27:59+5:30
गोवंश हत्याबंदी, राकेश मारियांची बदली, देशद्रोहाच्या गुन्ह्याविषयी सरकारने जारी केलेले परिपत्रक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवर आपण अडचणीचे प्रश्न उपस्थित केले

अडचणीचे प्रश्न विचारल्याने माझ्या हेतूंविषयी शंका
मुंबई: गोवंश हत्याबंदी, राकेश मारियांची बदली, देशद्रोहाच्या गुन्ह्याविषयी सरकारने जारी केलेले परिपत्रक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवर आपण अडचणीचे प्रश्न उपस्थित केले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हेतूंविषयी शंका घेत आपल्यावर व्यक्तिगत टीका केली, असे प्रत्युत्तर ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक राजदीप सरदेसाई यांनी दिले आहे.
सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले एक खुले पत्र ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास ‘लोकमत’च्याच मंगळवारच्या अंकातून उत्तर दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरास प्रत्युतर देताना सरदेसाई यांनी फडणवीस यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर खुलासा केला आहे.
सरदेसाई मुख्यमंत्र्यांना लिहितात की, आत्मचिंतन करून आपले काही चुकले असेल तर त्यात सुधारणा करणे मला आवडेल. पण कोणीही मला एका ठरावीक कप्प्यात बंद करणे मला आवडत नाही. सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्याची इच्छा धरून त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या उदारमतवादी व बहुढंगी भारताच्या संकल्पनेवर माझा दृढविश्वास आहे. पण त्यामुळे मी डाव्या विचारसरणीचा कसा होतो? मुख्यमंत्री त्यांच्याशी सहमत न होणाऱ्यांना किंवा त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना सरसकटपणे अशीच लेबले लावताना दिसते. मतांधतेविरुद्ध प्रश्न उपस्थित केल्याने मी बेगडी धर्मनिरपेक्षतादी कसा काय होतो? उलट त्यामुळे मी एक स्वाभिमानी व सहृहय भारतीय असल्याचे दिसते, असे सरदेसाई म्हणतात. (विशेष प्रतिनिधी)