ऐतिहासिक स्थळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: May 7, 2017 01:28 IST2017-05-07T01:28:48+5:302017-05-07T01:28:48+5:30
ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला

ऐतिहासिक स्थळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : ऐतिहासिक व वैभवशाली अशा दुहेरी सोनेरी इतिहासाची साक्ष असणारा वसई तालुका पुरातत्व विभागाच्या दृष्टीने दुर्लक्षणीय ठरला आहे. राज्य पुरातत्व व केंद्रीय पुरातत्व विभाग मिळून वसई तालुक्यातील केवळ ५ स्मारके, वास्तू पुरातत्व विभागाच्या संरक्षित यादीत येतात. केंद्रीय पुरातत्व विभागात सोपारा स्तूप, बुरूडकोटÞ, सोनारभाट, गासÞटाकी, उमराळे बोळींज़, वसई किल्ला, अर्नाळा किल्ला यांचा समावेश होतो.
प्रत्यक्षात या संरक्षित वास्तूंची संख्या मोजकीच असली तरीही त्याच्या संवर्धनाची बोंबाबोंब कायमच आहे. वसई तालुक्यात २०० हून अधिक ऐतिहासिक स्थानी प्राचीन मूर्त्या समाधी किल्ले आहेत. यातील बरेच अवशेष अत्यंत विखुरलेल्या व बिकट अवस्थेत शेवटचे क्षण मोजत आहेत.या वास्तूंचे संवर्धन कधी व कोण करणार हा प्रश्न आहे. यातील बरेच अवशेष इतिहासाची साक्ष आहेत.
ऐतिहासिक कागदपत्रांतून डोकावणारी ही गावे व त्यातील वैशिष्टयपूर्ण अवशेष संकलित करणे काळाची गरज आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या विखुरलेल्या इतिहासाच्या खूणा जपण्यासाठी पुरातत्व विभागाने ५० वर्षे वाया घालवली आहेत. येत्या काळात पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारकां व्यतिरिक्त इतर स्मारके आणि वास्तू , जतन करणारी अशी कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही. आणि पुढे होईल, अशी चिन्हेही दिसत नाहीत. यामुळे वसई तालुक्याच्या ऐतिहासिक अवशेषांचे भवितव्य अंधकार:मय आहे. वसई तालुक्याच्या प्रदीर्घ इतिहासात बिंब ञैकुट, अभिर, मौर्य, राष्ट्रकुट, चालुक्य शिलाहार, सातवाह़न, मौर्य, पोर्तुगीज, ब्रिटीश, मराठे इत्यादी राजवटी होऊन गेल्यात वसई तालुक्यातील प्रत्येक गावागावांत असणारे किल्ले , मूर्त्या, लेणी, समाधी, नाणी, वास्तु स्मारके, शिला लेख इत्यादींचे संशोधन व संवर्धन होणार तरी कधी? ते तत्परतेने झाल्यास सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक इतिहास संकलनास व संशोधनास एक नवीन दिशा उपलब्ध होईल.
ज्या व्यक्ती आणि संस्था यांना इतिहास संशोधन व संवर्धनात स्वारस्य आहे. त्यांची सातत्यपूर्ण मदत पुरातत्व खात्याने घेतल्यास या कामाला गती मिळू शकते. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा ठाम संकल्प व निर्णय घेण्याची आज आवश्यकता आहे, असे किल्ले वसई मोहीमेचे श्रीदत्त राऊत यांनी लोकमत न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.