शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

By Admin | Updated: November 22, 2014 03:08 IST2014-11-22T03:08:27+5:302014-11-22T03:08:27+5:30

अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

On the question of farmers, Shiv Sena attacked | शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

शेतक-यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

नाशिक : अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप घेण्यापेक्षा राज्य सरकारने आठ दिवसांत तत्काळ मदत जाहीर करावी, अन्यथा शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून मंत्र्यांना अधिवेशनाला बंदी घालू, असा इशारा विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे व आ. रामदास कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
शिंदे व कदम यांनी शुक्रवारी मांडसांगवी, ओझर व खडकजांब या गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शिंदे म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती असलेली नगदी पिके गेली आहे. त्यामुळे त्यांना आठ दिवसांत मदत जाहीर न केल्यास शिवसेना आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला़ बागलाण व देवघट येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येचे पाप सरकारने माथी घेऊ नये. आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर त्याला थेट मुख्यमंत्री व सचिवांना जबाबदार धरून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस आपणच केली होती़ मग आता तुमच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करणार काय, असा सवाल रामदास कदम यांनी केला.
कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये तसेच बागायतीसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी कदम यांनी केली़ (प्रतिनिधी)

Web Title: On the question of farmers, Shiv Sena attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.