कोकणात सर्वकाही शांत शांत
By Admin | Updated: October 16, 2014 04:33 IST2014-10-16T04:33:40+5:302014-10-16T04:33:40+5:30
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आठ मतदारसंघांतील ६८ उमेदवारांचे भवितव्य शांततेत झालेल्या मतदानाने सीलबंद झाले

कोकणात सर्वकाही शांत शांत
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आठ मतदारसंघांतील ६८ उमेदवारांचे भवितव्य शांततेत झालेल्या मतदानाने सीलबंद झाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे, त्यांचे पुत्र नीतेश राणे, दीपक केसरकर, माजी मंत्री उदय सामंत, भास्कर जाधव आदी प्रमुख उमेदवार यावेळी रिंग्ांणात होते. कोकणात पक्षांतरामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. यावेळी कोणाला विजयाचा गुलाल लावण्यापेक्षा कोणाचा पराभव करून धूळ चारायची, याचीच ईर्षा अधिक रंगली होती. त्यामुळे ही निवडणूक कोकणच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत मतांमध्ये केवळ दोन टक्के वाढ झाली असली, तरी त्याचा परिणाम निवडणूक निकालावर फारसा होणार नाही. कोकणात मतदान शांततेत होते का, याचीच अधिक चिंता सर्वत्र जाणवत होती. मात्र मतदानाच्या वेळी सर्वत्र उत्साह जाणवत नसला, तरी शांतता मात्र होती. भात कापणीची सुरुवात नुकतीच झाली असल्यामुळे ग्रामीण भागात तुलनेने मतदानात उत्साह कमी होता.