शेकाप राज्यात 35 जागा लढविणार!
By Admin | Updated: August 2, 2014 22:47 IST2014-08-02T22:47:14+5:302014-08-02T22:47:14+5:30
शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.

शेकाप राज्यात 35 जागा लढविणार!
पनवेल : देशात सत्तास्थानी बसलेल्या भारतीय जनता पक्षाने व शिवसेनेने आधी सीमा प्रश्न सोडवून दाखवावा, मगच मते मागण्यासाठी यावे असे आव्हान देत शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात किमान 35 जागा लढविणार असल्याचे संकेत आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कामोठे येथे दिले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार जयंत पाटील बोलत होते. राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने युती आघाडी न करता हिंमत असेल तर एकएकटे लढून दाखवावे, मग आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ, असे थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिले. आजर्पयत शेकापचे अनेक नेते पक्ष सोडून गेले परंतु शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता मात्र कुठेच गेला नाही म्हणूनच आजर्पयत कितीही लाटा आल्या तरीही पक्षाचा लाल बावटा डौलाने फडकत राहिला आहे.
ते म्हणाले की, या देशात आता काँग्रेस वाढू शकत नाही कारण त्यांच्याकडे आता नेतृत्व राहीले नाही. त्याचप्रमाणो भाजपा - शिवसेना देखील काँग्रेस विरोधात लढू शकत नसल्याने काँग्रेस विरोधी मतदारांना शेतकरी कामगार पक्ष हाच तिसरा पर्याय असल्याचे त्यांना समजले आहे. येत्या पंधरा ऑगस्टनंतर शेतकरी कामगार पक्ष आपले सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार विवेक पाटील यावेळी म्हणाले की, पनवेलच्या रस्त्यांप्रमाणोच स्थानिक काँग्रेसलाही खड्डे पडले आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी ढेपाळली आहे तर शिवसेना - भाजपा हवेत आहेत. बदलते पनवेल बहरते पनवेल या खोटय़ा जाहीराती पाहून कोणीही पनवेलमध्ये येण्याचे धाडस करु नका, कारण पनवेलच्या रस्त्यावरुन फिरताना तुमची गाडी पंर होईल व कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
शेकापचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार व जिल्हाचिटणीस बाळाराम पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही उरण व पनवेल मतदार संघात शेकापने आघाडी घेऊन शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता काय करु शकतो हे दाखवून दिल्याचे सांगितले. शेकापची आंदोलने ही केवळ ढोंगबाजी नसते तर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असतात. मतदारांचा कौल हा काँग्रेस विरोधी असून येत्या विधानसभेत काँग्रेस आघाडीला तख्तावरुन खाली खेचण्यासाठी व शेकापचा खटारा विधानसभेत पोहचविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार मिनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, तालुका चिटणीस नारायण घरत, पनवेल विधानसभा मतदार संघ अध्यक्ष काशीनाथ पाटील, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड, आंबेजोगाईचे नगरसेवक डॉ. राजेश इंगोले, जतचे बबन शिंगाडे, बिड जिल्हा चिटणीस मोहन गुंड, शेकापचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी आदि उपस्थित होते. सुरुवातीला दत्तुशेठ पाटील व मोहन पाटील यांना आदरांजली वाहिली.