वीज खंडित होण्यास पीडब्लूडी जबाबदार
By Admin | Updated: June 23, 2015 02:44 IST2015-06-23T02:44:58+5:302015-06-23T02:44:58+5:30
हिट अॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या शिक्षेचा निकाल जाहीर होत असताना सत्र न्यायालयात अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यासाठी सार्वजनिक

वीज खंडित होण्यास पीडब्लूडी जबाबदार
मुंबई : हिट अॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानच्या शिक्षेचा निकाल जाहीर होत असताना सत्र न्यायालयात अचानक खंडित झालेल्या वीजपुरवठ्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत बेस्टकडे यासंदर्भातील माहिती मागितली होती. बेस्टच्या ग्राहक सेवा विभागाने यावर दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०१५ रोजी दुपारी १:०१ ते १:२७ असा २६ मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी १:१० वाजता दूरध्वनी क्रमांक २२०२०२१८हून तक्रार प्राप्त होताच बेस्टने ती हाताळली. म्युझियम डीएसएस येथे टर्मिनेशन आणि अपोलो टीआर क्रमांक ४ येथे ट्रिपिंग झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. बेस्ट प्रशासनाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, सत्र न्यायालयात वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून यूपीएस सिस्टिम आणि जनरेटरची आपत्कालीन व्यवस्था करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची होती. कारण सत्र न्यायालयातील वीजपुरवठ्याचे परीक्षण सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केले जाते. महत्त्वाचे म्हणजे १ वर्षांत ४ वेळा वीजपुरवठा खंडित झाला असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. (प्रतिनिधी)