भूमिपूजनापासून सेनेला ठेवले दूर
By Admin | Updated: October 9, 2015 01:54 IST2015-10-09T01:54:14+5:302015-10-09T01:54:14+5:30
इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

भूमिपूजनापासून सेनेला ठेवले दूर
मुंबई : इंदू मिलच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभापासून शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी भाजपाने खेळली आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या कार्यक्रमाला हजर न राहता, बीडला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीची कल्पना सर्वप्रथम दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. त्यामुळे रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना-भाजपा युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने महायुतीत फूट पाडून आठवले यांच्या रिपाइंला आपल्यासोबत घेऊन शिवसेनेला एकटे पाडले होते. आता इंदू मिलच्या कार्यक्रमापासून शिवसेनेला दूर ठेवत, या स्मारकाचे श्रेय शिवसेनेला मिळू न देण्याची खेळी केली गेली आहे.
इंदू मिलच्या भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रिपाइं नेते आठवले हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्र व राज्य सरकारमधील घटकपक्ष या नात्याने उद्धव यांना बोलावण्यात येईल, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. मात्र, येणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन ठाकरे यांना टाळले गेले असावे. त्यामुळे एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन कार्यक्रमाला हजर न राहण्याचे ठाकरे यांनी ठरवले आहे. याबाबत एमएमआरडीएच्या जनसंपर्क विभागाकडे चौकशी केली असता, शुक्रवारी सकाळी कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना दिले जाईल, असे सांगण्यात आले.
मात्र, इंदू मिलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना देण्यात आल नसल्याचे समजते. याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून त्याद्वारे जो निधी उभा राहिला, त्यातून रविवारी बीडमधील शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता ते जाणार आहेत.’
राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार आले व देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला होता, पण या शपथविधी सोहळ््याचेही निमंत्रण उद्धव यांना मिळाले नव्हते. त्यामुळे ते या सोहळ््याला हजर राहणार नाहीत, असे सांगण्यात आले, पण अरुण जेटली यांनी दूरध्वनी केल्यामुळे उद्धव अगदी ऐनवेळी वानखेडेवर सहकुटुंब दाखल झाले होते. आताही ते भाजपाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याचा फोन आल्यास कार्यक्रमाला जाणार का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.