पुसदचा मौलाना एटीएसच्या रडारवर
By Admin | Updated: October 20, 2015 01:06 IST2015-10-20T01:06:58+5:302015-10-20T01:06:58+5:30
मूलतत्त्ववादी विचारधारेच्या मोहात अब्दुल मल्लीक (२०) याला पाडून त्याला राज्यात पोलिसांवर हल्ल्यासाठी तयार केल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या मौलानाची महाराष्ट्र

पुसदचा मौलाना एटीएसच्या रडारवर
- डिप्पी वांकाणी, मुंबई
मूलतत्त्ववादी विचारधारेच्या मोहात अब्दुल मल्लीक (२०) याला पाडून त्याला राज्यात पोलिसांवर हल्ल्यासाठी तयार केल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या मौलानाची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) चौकशी करीत आहे. हा मौलाना पुसद येथील असून, त्याने मल्लीकला पोलिसांवर हल्ले करण्यास चिथावणी दिली होती आणि तू जेव्हा ‘कुठेतरी’ गेल्यावर तुझे पालक तू बेपत्ता झाल्याची तक्रार करतील, असेही त्याला सांगितले होते. एटीएसने मल्लीकला आधीच बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कलमांखाली अटक केली असून, आता त्याचे म्हणणे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नोंदवून घेऊन मौलानाविरुद्ध कारवाई करणार आहे. राज्यातून एखाद्या मौलानाविरुद्ध प्रथमच एटीएसची कारवाई होत आहे.
अब्दुल मल्लीक याने २५ सप्टेंबर रोजी मशिदीत प्रार्थना केल्यावर बाहेर येऊन राज्यात गोमांस बंदीसाठी पोलीस कर्मचाऱ्याला जबाबदार धरून त्याला भोसकले होते. त्याला अडविणाऱ्या आणखी दोन पोलीस शिपायांनाही त्याने भोसकले. स्थानिक पोलिसांनी मल्लीकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, एटीएसकडूनही त्याची त्याचवेळी चौकशी होत आहे. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीत अब्दुलने आम्हाला त्याला मौलानाकडून (मौलानाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही) नियमितपणे मशिदीमध्ये प्रार्थनेनंतर दार्स दिले गेल्याचे सांगितले. भारतीय मुस्लिमांवर अत्याचार होत असताना ते (मुस्लीम) काहीही करीत नाहीत, असे हा मौलाना त्याला सांगायचा. भारतीय मुस्लिमांवरील अत्याचारांबद्दल पाकिस्तानी मुस्लीम संतप्त असल्याचे मौलाना सांगायचा व भारतीय मुस्लिमांनी एक होऊन ‘काहीतरी’ केले पाहिजे, असेही तो म्हणायचा.
तुला मी तुझ्या पालकांना काहीही न सांगता ‘कुठेतरी’ पाठविले तर ते तू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करतील असे काही वेळा मौलानाने मल्लीकला सांगितले होते. या त्याच्या विधानाकडे एटीएसचे लक्ष वेधले गेले आहे. २ आॅक्टोबर रोजी आम्ही चौकशी हाती घेतली आणि त्यानंतर मल्लीकवर यूएपीएचे कलम १५ व १६ अंतर्गत गुन्हे दाखल केले. आता आम्ही त्याचे म्हणणे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हेगारी प्रक्रिया संहितेचे कलम १६४ अंतर्गत नोंदवून घेत आहोत. त्यानंतर मौलानाच्या दिशेने सरकता येईल, असे हा अधिकारी म्हणाला. मौलानाचे संबंध कोणत्या दहशतवादी संघटनांशी आहेत का हे तपासायचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
मौलाना प्रथमच लक्ष्य
मूलतत्त्ववादी विचारांची चिथावणी मिळालेले तरुण राज्यभर असून, त्यांना शोधून काढायचे आणि त्यांना त्या प्रभावातून बाहेर काढण्याचे फार मोठे काम एटीएससमोर आहे.
एटीएसच्या राडारखाली थेट मौलाना येण्याची ही मात्र पहिलीच वेळ आहे.