तूर खरेदीसाठी राष्ट्रवादी आंदोलनाच्या पवित्र्यात
By Admin | Updated: April 24, 2017 17:31 IST2017-04-24T17:18:09+5:302017-04-24T17:31:41+5:30
सरकारने तूर खरेदी केंद्रे पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे

तूर खरेदीसाठी राष्ट्रवादी आंदोलनाच्या पवित्र्यात
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 24 - राज्यात मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी शिल्लक असतानाच सरकारने तूरखरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने तूर खरेदी केंद्रे पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
आज सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केले. तटकरे म्हणाले, "सरकारने तूर खरेदी केंद्रे लवकरात लवकर सुरू करावीत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल." भाजपा सरकार फक्त ट्विटरवरून टिवटिव करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा उद्यापासून
शेतकऱ्यांच्या कर्जामाफीच्या मागणीसाठी सुरू झालेल्या संघर्षयात्रेचा तिसरा टप्पा मंगळवारी कोल्हापूर येथून सुरू होईल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्याबरोबरच शेतकऱ्यांना ठराविक मर्यादेपर्यंत नको तर संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी केली.