पुरोहितांचे स्टिंग हे पक्षांतर्गत खदखदीचं प्रतीक - शरद पवार
By Admin | Updated: June 27, 2015 17:42 IST2015-06-27T13:39:41+5:302015-06-27T17:42:52+5:30
राज पुरोहित यांचे स्टिंग ऑपरेशन म्हणजे भाजपातील पक्षांतर्गत खदखदीचं प्रतीक आहे असे सांगत भाजपामध्ये वाईट दिवस इतक्या लवकर येतील असं वाटलं नव्हतं असा टोला शरद पवार यांनी लगावला.

पुरोहितांचे स्टिंग हे पक्षांतर्गत खदखदीचं प्रतीक - शरद पवार
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २७ - राज पुरोहित यांचे स्टिंग ऑपरेशन म्हणजे भाजपातील पक्षांतर्गत खदखदीचं प्रतीक आहे असे सांगत भाजपामध्ये वाईट दिवस इतक्या लवकर येतील असं वाटलं नव्हतं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. औंरगाबादमध्ये बोलताना त्यांनी भाजपामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत ही टिपण्णी केली. 'पुरोहित यांच्या स्टिग ऑपरेशनच्या निमित्ताने पक्षात किती खदखद आहे हे स्पष्ट होते' असे ते म्हणाले. मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष व आमदार राज पुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनची सीडी प्रसारित झाली असून त्यात पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर टीका केली असून पक्षाचे आमदार मंगलप्रभात लोढांनाही लक्ष्य केल्याने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवार यांनीही टिपण्णी केली.
केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांची एकापाठोपाठ एक प्रकरणे बाहेर येत असून पंकजा मुंडे यांच्या चिक्की घोटाळा प्रकरणावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 'चिक्की घोटाळ्यावर काहीही बोलण्याची गरज वाटत नाही' असे ते म्हणाले.