दूध खरेदी २0 रुपयांनीच
By Admin | Updated: July 24, 2015 01:19 IST2015-07-24T01:19:59+5:302015-07-24T01:19:59+5:30
सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून २० रुपये दराने दूध खरेदी करावी आणि ग्राहकांनादेखील २ रुपये कमी दराने दुधाची विक्री

दूध खरेदी २0 रुपयांनीच
मुंबई : सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून २० रुपये दराने दूध खरेदी करावी आणि ग्राहकांनादेखील २ रुपये कमी दराने दुधाची विक्री करावी असे निर्देश सहकार कायद्यान्वये देण्यात आले आहेत. पण जे सहकारी दूध संघ हे निर्देश मान्य करणार नाहीत ते बरखास्त केले जातील, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत रात्री उशिरा केली.
विरोधकांनी आणलेल्या २९३च्या प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. मात्र सभागृहात बोटावर मोजण्याएवढेच विरोधी सदस्य उपस्थित होते. खडसे यांनी या वेळी अनेक घोषणा केल्या. ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे अशांना बियाणेदेखील मोफत दिली जातील. चाऱ्याच्या छावण्या न उभ्या करता चारा आणि पशुखाद्य निर्माण करण्यासाठी अनुदान दिले जाईल. टँकर लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार बीडीओ आणि तहसीलदारांना दिले जातील. स्थानिक आमदारांशी चर्चा करून टँकर चालू करण्याचे निर्णय घेतले जातील.
राज्यातील छोट्या शेतकऱ्यांना डिझेल पंप ५० टक्के सवलतीत दिले जातील. शिवाय काही लीटर डिझेलही मोफत दिले जाईल. या पंपांच्या साहाय्याने असे शेतकरी पाणी काढू शकतील आणि उरलेल्या वेळात त्याचा वापर विजेसाठी त्यांना करता येईल, असेही खडसे म्हणाले.
राज्यातील १ कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आहे. पण ज्यांच्या नावावर शेती आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याचा अपघात विमा सरकारतर्फे काढला जाईल; आणि त्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांचादेखील समावेश करावा यासाठी विमा कंपन्यांशी बोलणी झाल्याचे खडसे यांनी जाहीर केले. १ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या आर्थिक दृष्टीने दुर्बल शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही मर्यादा आता अडीच लाख उत्पन्नापर्यंत केल्याचे ते म्हणाले. औरंगाबादला डॉपलर रडार पोहोचले असून, दोन-तीन दिवसांत त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील व परिस्थितीनुसार कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली जाईल; पण ती वेळ सरकारवर येऊ नये अशी आपली इच्छा असल्याचे खडसे यांनी सांगितले.
एफआरपीचा कायदा केंद्राने केला आहे. तो रद्द करण्यासाठीचे बिल जर लोकसभेत आणले गेले तर काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असे आपणास पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे मात्र लोकसभा शांततेत चालली तर तसे बिल आणता येईल असा चिमटाही खडसे यांनी काढला. (विशेष प्रतिनिधी)