‘महागडे’ स्वेटर खरेदीची निविदा रोखली
By Admin | Updated: January 6, 2016 02:16 IST2016-01-06T02:16:44+5:302016-01-06T02:16:44+5:30
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी २१०० रुपये किमतीचे ‘महागडे’ वुलन स्वेटर खरेदीची निविदा रोखण्यात आली असून पूर्वीसारखे कॉटनमिक्स स्वेटरच देण्यात येतील

‘महागडे’ स्वेटर खरेदीची निविदा रोखली
यदु जोशी, मुंबई
राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी २१०० रुपये किमतीचे ‘महागडे’ वुलन स्वेटर खरेदीची निविदा रोखण्यात आली असून पूर्वीसारखे कॉटनमिक्स स्वेटरच देण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना हिवाळा संपल्यानंतर वूलनचे स्वेटर दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात दिल्यानंतर आदिवासी विकास खात्यात खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत याबाबत मंत्री सावरा यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते.
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १४०० ते २१०० रुपये दराने स्वेटर खरेदीसंबंधीची निविदा अंतिम होण्याच्या मार्गावर होती. मात्र सावरा यांनी मंगळवारी ती रोखली. त्यामुळे जवळपास ३० कोटींच्या खरेदीला चाप बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्वेटर खरेदीबाबत लोणावळ्यातील निसर्गरम्य ठिकाणी अर्थपूर्ण हालचाली झाल्या होत्या. मंत्री सावरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, स्वेटर खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. १०० टक्के वूलनचे स्वेटर देणे हे प्रॅक्टिकल नाही. यासाठी ड्रायक्लिनिंगची सोय आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थी कुठून करणार? उपाय म्हणून पूर्वीप्रमाणेच वूलन-कॉटनमिक्स स्वेटर घ्यावे लागतील. या खरेदीसंबंधीच्या निर्णय व अंमलबजावणीत कालापव्यय होऊ देणार नाही.