टोकन दिलेली सर्व तूर खरेदी करा

By Admin | Updated: July 6, 2017 04:06 IST2017-07-06T04:06:16+5:302017-07-06T04:06:16+5:30

राज्यातील तूर खरेदी केंद्रावर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Purchase all the tokens given token | टोकन दिलेली सर्व तूर खरेदी करा

टोकन दिलेली सर्व तूर खरेदी करा

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील तूर खरेदी केंद्रावर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मात्र, या तुरीची खरेदी करताना ती शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची याची काटेकोर तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार डॉ. संजय कुटे, डॉ.अनिल बोंडे, प्रशांत बंब, आशिष देशमुख, आदींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत त्यांना निवेदन दिले होते. तूर खरेदीची शेवटची मुदत १० जूनपर्यंत असतांना शेतकऱ्यांची तूर पावसाने भिजू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ३१ मेपर्यंत तुरीचे टोकन घेण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र १० जूनला तूर खरेदी थांबविल्यानंतर टोकनधारक शेतकरी तूर विक्रीपासून वंचित राहिले असल्याची तक्रार या आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केली.
ज्या शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंतच्या कालावधीत तूर खरेदीचे टोकन घेतले आहे अशा सर्वांची तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली होती. याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, ही तूर शेतकऱ्यांचीच खरेदी केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी करता कामा नये. याबाबत संबधित यंत्रणेने काटेकोर तपासणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

Web Title: Purchase all the tokens given token