परभणीत सुटीच्या दिवशी ८०० क्विंटल तुरीची खरेदी
By Admin | Updated: March 6, 2017 05:12 IST2017-03-06T05:12:15+5:302017-03-06T05:12:15+5:30
तूर विक्रीसाठी वाढत जाणाऱ्या रांगा लक्षात घेऊन परभणी येथील तूर खरेदी केंद्र रविवारीही सुरू ठेवण्यात आले़

परभणीत सुटीच्या दिवशी ८०० क्विंटल तुरीची खरेदी
परभणी : तूर विक्रीसाठी वाढत जाणाऱ्या रांगा लक्षात घेऊन परभणी येथील तूर खरेदी केंद्र रविवारीही सुरू ठेवण्यात आले़ सायंकाळपर्यंत ८०० क्विंटल तुरीची खरेदी झाली़
जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले आहे़ त्यामुळे आवक वाढली आहे़ खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे़ त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी रांगा लावल्या आहेत़ मागील दहा दिवसांपासून येथील हमीभाव खरेदी केंद्रावर शेकडो वाहने रांगा लावून आहेत़ रविवारी साधारणत: तीन किमी अंतरापर्यंत १०० ते १५० वाहने रांगेत होते़ त्यामुळे सुटीच्या दिवशीही खरेदी सुरू होती.
वाहनांमधून तुरीचे पोते काढणे, तुरीची चाळणी करणे आणि वजन करण्याचे काम सुरू होते़ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८०० क्विंटल तुरीची खरेदी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत १० हजार ५३५ क्विंटल तूर खरेदी झाली आहे़ (प्रतिनिधी)
>धनादेशास विलंब
जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांचे धनादेश काढण्यासाठी विलंब लागत आहे़ तुरीची खरेदी केल्यानंतर खरेदीच्या पावत्या आणि शेतकऱ्यांच्या सातबारा, पीक पेरा आदी कागदपत्रे नाफेडकडे पाठविली जातात़
त्यानंतर नाफेड जिल्हा मार्केटींग फेडरेशन अधिकाऱ्यांच्या नावे पेमेंट जमा करते व तेथून पुढे ते शेतकऱ्यांच्या नावे धनादेशाद्वारे दिले जातात़ या सर्व प्रक्रियेला किमान सात ते १२ दिवस लागतात.