शिक्षा होताच बडतर्फ करणार
By Admin | Updated: September 30, 2015 02:52 IST2015-09-30T02:52:21+5:302015-09-30T02:52:21+5:30
गैरवर्तन आणि गैरव्यवहारावरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली तरी अपिलात जाऊन शासकीय सेवेत कायम राहण्याच्या प्रकारांना यापुढे चाप लागणार आहे.

शिक्षा होताच बडतर्फ करणार
यदु जोशी, मुंबई
गैरवर्तन आणि गैरव्यवहारावरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली तरी अपिलात जाऊन शासकीय सेवेत कायम राहण्याच्या प्रकारांना यापुढे चाप लागणार आहे. कारण न्यायालयाने शिक्षा ठोठावताच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांस तत्काळ बडतर्फ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे, की जर एखाद्या अपील न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात कनिष्ठ न्यायालयातील अपराधसिद्धीस (कन्व्हिक्शन) स्थगिती दिली असेल, तर मुळात अपराधसिद्धी स्थगित होत असल्याने कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षेची कार्यवाही प्रलंबित ठेवावी आणि अपिलाचा अंतिम निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा.
--------------
राज्यातील काही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असली तरी ते सेवेत कायम असल्याच्या मुद्द्यावरून वर्षभरापूर्वी वादळ उठले होते. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना सरकारने घरी पाठवण्यात आले असले तरी ४६ कर्मचारी अजूनही सेवेत आहेत.
------------------
सामान्य प्रशासन विभागाचा आदेश
अपील न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या केवळ अंमलबजावणीस (एक्झिक्युशन आॅफ सेंटेन्स) स्थगिती दिली असेल, तर अपील न्यायालयाच्या अंतिम आदेशाची वाट न पाहता बडतर्फीची तत्काळ कारवाई करावी. त्यामुळे शिक्षा ठोठावलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ घरी जावे लागणार आहे.
-----------
शिक्षा होऊनही बडतर्फ
न झालेले कर्मचारी
विभाग संख्या
गृह१६
नगरविकास/मनपा ०६
महसूल ११
ऊर्जा ०५
शिक्षण ०३
उद्योग ऊर्जा व कामगार ०१
अन्न व नागरी पुरवठा ०१
सार्वजनिक बांधकाम ०१
सार्वजनिक आरोग्य ०२
एकूण ४६