विसर्जनासाठी पुणे पॅटर्नचा अवलंब व्हावा
By Admin | Updated: September 5, 2016 03:28 IST2016-09-05T03:28:03+5:302016-09-05T03:28:03+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारच्या जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांंना मीरा-भार्इंदर महापालिकेने तिलांजली दिली

विसर्जनासाठी पुणे पॅटर्नचा अवलंब व्हावा
मीरा रोड : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारच्या जलप्रदूषण रोखण्यासह पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचनांंना मीरा-भार्इंदर महापालिकेने तिलांजली दिली होती. मात्र, आता गणेश चतुर्थीच्या आधी नागरिकांना पुणे पॅटर्नप्रमाणे बादलीत गणेशमूर्ती विसर्जनाचे आवाहन केले आहे. याबाबतच्या बैठकीस नगरसेवकांनाही डावलण्यात आले. याबाबत नगरसेवकांनी लेखी तक्रार केली आहे.
मीरा - भार्इंदरमध्ये महापालिकेकडून सार्वजनिक तलाव, खाडी, नदी व समुद्रकिनारी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली जाते. हजारो लहानमोठ्या मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने जलप्रदूषण होते. तलावातील गाळ आणि मासे मरून पडण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. मात्र, प्रशासन व लोकप्रतिनिधी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात.
जलप्रदूषण कमी करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीचे घरच्याघरी विसर्जन करण्याचे आवाहन महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील व आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी पालिकेच्यावतीने नागरिकांना केले. त्यासाठी ३१ आॅगस्टला मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात याची प्रात्यक्षिके तसेच बैठक झाली. महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह स्थायी समिती सभापती हरिश्चंद्र आमगावकर, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे उपस्थित होते.
पुणे महापालिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने छोट्या आकाराच्या मूर्ती घरच्याघरी बादलीमध्ये विसर्जित करण्याचा उपक्रम राबवला जातो. याबाबत, पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक डॉ. शुभांगी उंबरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. यात लहान आकाराच्या मूर्ती घरीच विसर्जित करण्यासाठी त्या आकाराच्या बादलीत पाणी घेऊन मूर्तीच्या वजनाचे अमोनियम बायकार्बोनेट (बेकरीत वापरला जाणारा सोडा) मिसळावे. मग, त्यात मूर्तीचे विसर्जन करायचे. दर दोनतीन तासांनी मिश्रण ढवळायचे. ४८ तासांत मूर्ती विरघळते.
स्थिर झालेल्या पाण्यातून अमोनियम सल्फेट नावाचे उत्तम प्रतीचे खत मिळते. तर, विघटनातून उरलेल्या कॅल्शियम कार्बोनेटचे अनेक उपयोग आहेत, अशी माहिती उंबरकर यांनी दिली.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींसाठी वापरला जाणारा रंग घातक रसायनांपासून तयार होतो. शिवाय, प्लास्टर आॅफ पॅरिस विरघळत नाही. पण, घरच्याघरी विसर्जन केल्यास प्रदूषण टाळता येते, असे डॉ. उंबरकर म्हणाल्या. त्या अनुषंगाने पालिकेने भक्तांसाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात अमोनियम बायकार्बोनेट विनामूल्य उपलब्ध असल्याचे महापौर म्हणाल्या. (प्रतिनिधी)
>अधिकाऱ्यांवर कारवाई करा; आयुक्तांकडे तक्रार
पालिकेने याबाबतची कोणतीच कल्पना नगरसेवकांना दिली नसल्याबद्दल शिवसेना नगरसेवक जयंतीलाल पाटील यांनी संताप व्यक्त केला.
आयुक्तांकडे लेखी तक्रारच केली असून बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.