पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 03:06 IST2017-04-19T03:06:39+5:302017-04-19T03:06:39+5:30
स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून मंगळवारी महापालिकेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा केला.

पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा
पुणे : स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून मंगळवारी महापालिकेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा केला. भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी गणेश घोष यांचा अगदी शेवटच्या क्षणी पत्ता कट करून माजी गटनेते गणेश बिडकर यांच्या नावाची स्वीकृतसाठी घोषणा करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील पक्ष कार्यालयाबरोबरच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या पाच जागांसाठी निवड होणार आहे. मंगळवारी दुपारी ३ ते ४ ही अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत होती. संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. पक्षनेत्यांकडून यासाठी गोपाळ चिंतल, रघुनाथ गौडा आणि गणेश घोष यांची नावे निश्चित करण्यात आली होती. यामुळे घोष कार्यकर्त्यांसह अर्ज भरण्यासाठी महापालिकेत उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज अंतिम करण्याबाबत भिमाले यांच्या कार्यालयात चर्चा सुरु होती. त्यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून फोन आला. माजी गटनेते गणेश बीडकर यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले. यामुळे घोष यांचा ताबाच सुटला. भिमाले यांच्या समोर असलेल्या उमेदवारांच्या नावाची फाईलच त्यांनी खिडकीतून फेकून दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी भिमाले यांच्या कार्यालयातील कुलर, टी पॉय, खुर्चा व दाराच्या काचा फोडल्या. बीडकर यांनाही धक्काबुकी करण्यात आली. त्यामुळे बीडकर यांचे कार्यकर्तेही संतप्त झाले. बीडकर आणि घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड करत संताप व्यक्त केला.
दरम्यान, बीडकर यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा कडे करून अर्ज भरण्यासाठी आयुक्त कार्यालयात सुखरूप पोहचवले. यामध्ये घोष जखमी झाल्याने त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. भिमाले यांनाही धक्काबुकी करण्यात आली. त्यांच्या हाताला काच लागल्याने दुखापत झाली. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)