पुणे-मुंबई इंटरसिटी रद्द
By Admin | Updated: June 7, 2015 02:54 IST2015-06-07T02:54:25+5:302015-06-07T02:54:25+5:30
मुंबईत झालेल्या मेगा ब्लॉकमुळे सायंकाळी पुण्याहून मुंबईला जाणारी इंटरसिटी ट्रेन शनिवारी अचानक रद्द करण्यात आली.

पुणे-मुंबई इंटरसिटी रद्द
पुणे : मुंबईत झालेल्या मेगा ब्लॉकमुळे सायंकाळी पुण्याहून मुंबईला जाणारी इंटरसिटी ट्रेन शनिवारी अचानक रद्द करण्यात आली. परिणामी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे काही काळ रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
इंटरसिटीने मुंबईला जाण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. मात्र मुंबईतील मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून सायंकाळी ५.५५ वाजता निघणारी इंटरसिटी रद्द करण्याच्या सूचना मुंबई कार्यालयातून पुणे कार्यालयास देण्यात आल्या. त्यामुळे गाडी रद्दची घोषणा होताच स्थानकावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. उपस्थित हजारो प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्याने, त्यांची समजूत काढताना रेल्वे प्रशासनासही तारेवरची कसरत करावी लागली.
पुण्याहून जाणारी इंटरसिटी रद्द करण्यात आली असल्याने, आज (रविवारी) सकाळी मुंबईहून पुण्याला येणारी इंटरसिटी रद्द करण्यात आली आहे. मात्र पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही प्रवाशांना सायंकाळी ६.३० च्या इंद्रायणी एक्स्प्रेसमधून मुंबईला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र प्रवाशांची संख्या मोठी असल्याने, अनेक प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. इंटरसिटी रद्द झाल्याने, काही प्रवाशांनी मुंबईला जाणे रद्द केले, तर काही प्रवाशांनी इतर पर्यायी व्यवस्थेचा शोध घेतला.