स्वयंशिस्तीने भारावले पुणे
By Admin | Updated: September 26, 2016 01:18 IST2016-09-26T01:18:53+5:302016-09-26T01:18:53+5:30
लाखोंची गर्दी पण न बोलणारी, मोर्चाच, पण एकही घोषणा नसलेला, असा वेगळाच अनुभव रविवारी पुण्याने घेतला. या गर्दीला नेता नव्हता, विशिष्ट गणवेश नव्हता तरीही गर्दीला एक शिस्त होती

स्वयंशिस्तीने भारावले पुणे
पुणे : लाखोंची गर्दी पण न बोलणारी, मोर्चाच, पण एकही घोषणा नसलेला, असा वेगळाच अनुभव रविवारी पुण्याने घेतला. या गर्दीला नेता नव्हता, विशिष्ट गणवेश नव्हता तरीही गर्दीला एक शिस्त होती. कुठेही कसला गोंधळ नव्हता, गडबड नव्हती. मराठा क्रांती मूक मोर्चासाठी जमलेल्या अवघ्या मराठाजनांनी दाखविलेल्या या स्वयंशिस्तीने सगळे पुणे भारावले. राजकीय लोकांना वेगळे महत्त्व नाही, हे या मोर्चाचे वैशिष्ट्य होते.
गर्दी बोलत होती, मात्र ती हातात घेतलेल्या फलकांमधून. मोर्चाच्या मागण्यांबरोबरच कोपर्डी घटनेचा निषेध करणारे, त्यातील दोषींना फाशी द्यावी, अशी मागणी करणारे फलक त्यांच्या हातात होते. मोर्चाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांनी काही समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाणी, चहा अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती, मात्र अगदी अपवादानेच मोर्चातील कोणी पाणी किंवा अन्य काही घेताना दिसत होते. ओळखीचे कोणी भेटले तरीही त्याला केवळ नमस्कार करून अनेक जण मोर्चात पुढे जात होते.
एरवी मोर्चा म्हटले, की त्यातील गर्दीला अनेक फाटे फुटतात. या मोर्चातील मात्र कोणीही मोर्चा सोडून शेवटपर्यंत बाहेर पडला नाही. लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात एका राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चाच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांच्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मोर्चात येण्याचा प्रयत्न केला, त्याला कार्यकर्त्यांनी लगेचच अटकाव केला. मोर्चाच्या अग्रभागी महिला आहेत, त्यामुळे मोर्चाच्या शेवटी सहभागी व्हावे, असे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यांनाही ते मान्य करावे लागले.
एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या नावांसहित स्वागताचे फलक लावले होते. सरबताचीही व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल ८ हजार स्वयंसेवक काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये मोर्चात होते. त्यांना एका ध्वनिवर्धकावरून सूचना दिल्या
जात होत्या.
(प्रतिनिधी)