पुणे - अपघातात पतीनंतर पत्नीचाही मृत्यू, रमजान सणाच्या दिवशीच मुस्लिम कुटुंबावर शोककळा
By Admin | Updated: July 7, 2016 10:54 IST2016-07-07T10:54:25+5:302016-07-07T10:54:25+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर बालाजीनगरच्या समोर नाणेकरवाडीच्या हद्दीत झालेल्या अपघातातील गंभीर जखमी झालेल्या महिलेचाही रात्री उशिरा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली
पुणे - अपघातात पतीनंतर पत्नीचाही मृत्यू, रमजान सणाच्या दिवशीच मुस्लिम कुटुंबावर शोककळा
>ऑनलाइन लोकमत -
चाकण (पुणे), दि. 07 - पुणे-नाशिक महामार्गावर बालाजीनगरच्या समोर नाणेकरवाडीच्या हद्दीत एस टी बस रस्त्यावर अचानक थांबल्याने चार वाहने एकावर एक धडकून बुधवारी झालेल्या विचित्र अपघातातील गंभीर जखमी झालेल्या महिलेचाही रात्री उशिरा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात हसीनाचे पती इर्शाद सय्यद जागेवरच ठार झाले होते. हसीना व मुलगा ईशान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हसीनाचा मृत्यू झाल्याने ऐन रमजान सणाच्या दिवशी इर्षादच्या कुटुंबावर शोककळा पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास बालाजीनगरच्या सिद्धी कॉम्प्लेक्स समोर झाला होता. दुचाकीवरील इर्शाद बुडन सय्यद ( वय २८, रा. दिघी, ता. हवेली, मुळगाव चिंचोली, जुन्नर, जि. पुणे ) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी हसीना ( वय २५ ) व मुलगा ईशान ( वय ३ ) हे गंभीर जखमी झाले होते. हसीनावर उपचार चालू असताना बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे बाजूकडून चाकण कडे येत असणारी मोटार सायकल (क्र. एम.एच . १२ एफ डब्लू ३२६२ ) ही पुणे -नाशिक महामार्गावर असणा-या हिमराज शितगृहा जवळील बस थांब्यावर बस अचानक थांबल्याने बसच्या मागे थांबली असता पाठीमागून येणारा टाटा एस (क्रमांक एम .एच.१४ जे एम ४९९० ) हा टेम्पो थांबला. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणारा आयशर टेम्पो ( क्रमांक एम एच १४ ए एस ७३०८ ) हा पुढे उभा असलेल्या टेम्पो वर जोरात आदळल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात टेम्पो चालकही जखमी झाला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार चालू असून पुढील तपास चाकण पोलीस करीत आहे.