पूूल व्यवस्थापनकार्यालय लवकरच अकोल्यात !
By Admin | Updated: September 29, 2016 01:57 IST2016-09-29T01:57:10+5:302016-09-29T01:57:10+5:30
यवतमाळ येथून होणार हलविणार!

पूूल व्यवस्थापनकार्यालय लवकरच अकोल्यात !
संजय खांडेकर
अकोला, दि. २८- रायगड जिल्ह्यातील महाड येथील पूल खचल्याच्या घटनेनंतर शासनाने राज्यभरात जुन्या पुलांची निगा राखणे आणि नवीन पूल निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सार्वजनिक बांधकामच्या अकोला विभागातही या मोहिमेला गती मिळाली असून, यवतमाळ येथील पूल व्यवस्थापनाचे स्वतंत्र कार्यालय अकोल्यात हलविले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात हे कार्यालय कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्हय़ातील मन आणि पूर्णा नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहेत. दोन्ही पुलांची स्थिती वरवर जरी चांगली दिसत असली, तरी भार पेलण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही पूल कुचकामी आणि कालबाहय़ झाले आहेत. ब्रिटिशांनी दोन्ही पुलांची कालर्मयादा संपुष्टात आल्याचा आणि निकामी करण्याचा अहवाल याआधीच पाठविला आहे; मात्र त्याकडे राज्य शासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नव्हते. महाड येथील पूल खचल्याच्या घटनेत अनेक निरपराधांचा बळी गेला. त्यानंतर शासनाने राज्यभरातील ब्रिटिशकालीन पुलांची माहिती गोळा करून बैठक घेतली. सोबतच ज्या परिसरात ब्रिटिशकालीन पूल आहेत, अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकार्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. पुलाच्या देखभालीसंदर्भात काय उपाययोजना करता येतील, याबाबत अहवाल द्यावा, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ज्या भागात नव्याने पुलांची निर्मिती होणार आहे, अशा परिसरावरदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष कें द्रित केले आहे. सोबतच अकोल्यातील रेल्वे ओव्हर ब्रीजकडेही पूल व्यवस्थापन विभाग लक्ष ठेवणार आहे. जिल्हय़ातील ब्रिटिशकालीन पूल आणि नव्याने उभारल्या जाणार्या पुलांची निगा राखण्यासाठी यवतमाळ येथील पूल व्यवस्थापनचे कार्यालय ऑक्टोबरमध्ये अकोल्यात येत आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही या प्रक्रियेला दुजोरा दिला आहे. अभियंता अधिकार्यांच्या या पथकाकडे पूल व्यवस्थापनाशिवाय दुसरे कोणतेही काम राहणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
पूल व्यवस्थापनासाठी यवतमाळ येथील कार्यालय अकोल्यात हलविण्याचे आदेश निघाले आहेत. लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शासनाच्या निर्देशान्वये कारवाई केली जात आहे.
-एस. एस. मुरादे
प्रभारी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला.