मुरगूड, आकुर्डेत शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा
By Admin | Updated: February 18, 2015 23:43 IST2015-02-18T23:24:19+5:302015-02-18T23:43:51+5:30
इतिहासाला उजाळा : मुरगूड शिवकालीन लष्करी ठाणे; पाटगाव मौनी महाराजांचे स्थान

मुरगूड, आकुर्डेत शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा
रमेश वारके- बोरवडे =-शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच आपल्याला शक्ती मिळते. छत्रपतींची चरणधूळ ज्या भागांना लाभली ते भाग खरोखर पुण्यवान होत. मुरगूड आणि आकुर्डे हा भागही याला अपवाद नाही. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने ही माती पवित्र झाली आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरगूड आणि आकुर्डेतील स्मृती जपणे ही काळाची गरज आहे. मुरगूड हे शिवकालीन लष्करी ठाणे होते. तर भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथून छत्रपती शिवाजी महाराज हे मौनी महाराजांच्या पाटगाव भेटीला गेले, तो मार्ग आजही विजयमार्ग नावाने ओळखला जातो. रस्त्याच्या दुतर्फा याची आठवण म्हणून व्ही. टी. पाटील यांनी दोन स्तंभ उभे केले आहेत.मुरगूड शिवरायांचे ठाणे होते. या ठाण्याचा ठाणेदार देसाई रुद्राप्पा नाईक यांना आपल्या मुद्रेनिशी महाराजांनी ११ डिसेंबर १६७६ मध्ये मोडी लिपिद्वारे आदेश देऊन शत्रूची ठाणी उठवून आपली ठाणी बसवावी, असे पत्र लिहिले होते. या ऐतिहासिक पत्राच्या तर्जुम्यातून शिवाजी महाराजांचा मुरगूड ठाण्याशी संपर्क होता हे सिद्ध होते. याच अनुषंगाने १६७६ मध्ये महाराजांना गुरुस्थानी असणारे पाटगावचे मौनी महाराज यांच्या भेटीसाठी त्यावेळच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाटगावला जाण्याचा जो मार्ग निवडला त्या मार्गानेच मुरगूड ठाण्यातील मार्गाचा समावेश होता. सध्या मुरगूड येथे असलेल्या श्री बिरदेव मंदिराजवळून जाण्याचा मार्ग निवडला. याचा अर्थ या बिरदेव मंदिराच्या परिसरास शिवरायांचा पदस्पर्श झाला आहे.या बिरदेव मंदिराबाबत प्रचलित मौखिक आणि ऐतिहासिक घटनेद्वारे या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केल्याचे निदर्शनास येते. कारण या मंदिराचे केलेले बांधकाम हे रायगड येथील जगदिश्वर मंदिराच्या बांधकामाशी मिळतेजुळते आहे. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने या मंदिराच्या मूळ बांधकामात बदल झाला आहे.भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे आजही आपणास छत्रपतींच्या आठवणींना उजाळा मिळतो. गारगोटी-पाटगाव रस्ता या मार्गाने शिवाजी महाराज हे १६७६ मध्ये योगीराज सद्गुरू मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यास पाटगावला गेले आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने शिवछत्रपतींनी दक्षिणेत दिग्विजय मिळविला. या पवित्र इतिहासाच्या स्मरणार्थ या मार्गास विजयमार्ग नावाने संबोधले जाते. म्हणूनच छत्रपतींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या स्मृती जपून त्याची आणखीन नवीन माहिती उजेडात यावी ही काळाची गरज आहे.
‘मुरगूडच्या देसाई रुद्राप्पा नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र तसेच येथे असलेल्या बिरदेव मंदिराच्या प्रचलित ऐतिहासिक व मौखिक घटनांच्या आधारावर महाराजांनी पाटगावला जाण्यासाठी या मार्गांचा वापर केल्याने हा परिसर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. नाईक यांंना पाठविलेले पत्र व छत्रपती आणि मौनी महाराज भेट हे साल १६७६ आहे. त्यामुळे महाराजांच्या या ठिकाणी संपर्क होता हे सिद्ध होते.’
- एम. डी. रावण (मुरगूड), व्ही. डी. पाटील (आकुर्डे), इतिहास अभ्यासक
आकुर्डे येथून ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज हे मौनी महाराज यांच्या भेटीसाठी गेले, त्याची स्मृती म्हणून या मार्गावर दोन्ही बाजूस व्ही. टी. पाटील यांनी स्तंभ उभे केले आहेत. यास विजयमार्ग म्हणूनही ओळखले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरगूडचे देसाई नाईक यांना पाठविलेल्या पत्राची प्रत.