घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम
By Admin | Updated: February 3, 2015 09:55 IST2015-02-03T01:05:18+5:302015-02-03T09:55:52+5:30
घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी प्रकाशक परिषदेने घेतला

घुमान संमेलनावर बहिष्काराचा प्रकाशकांचा निर्णय कायम
पुणे : घुमान येथे होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी प्रकाशक परिषदेने घेतला असून, महामंडळ तसेच संयोजकांबरोबरची चर्चेची द्वारेही बंद करण्यात आली आहेत. महामंडळ आणि संयोजकांनी प्रकाशकांबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी केला आहे.
घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रकाशकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. घुमानमध्ये मराठी भाषिक नसल्याने तेथे पुस्तकविक्री होणार नाही, प्रकाशकांनी घुमानला जाणे म्हणजे वेळ आणि पैशाचा अपव्यय असल्याचे सांगण्यात येत होते. यावर तोडगा म्हणून विभागीय संमेलन घ्यावे, असाही मतप्रवाह होता.
घुमान येथे संमेलन घेण्याचे जाहीर झाल्यानंतर या मुद्द्यावरून साहित्य महामंडळ, संमेलनाचे आयोजक आणि प्रकाशक यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटावा म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी मध्यस्थी केली होती. महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि संयोजक संजय नहार यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रकाशकांचे नुकसान होऊ देणार नाही, असा मुद्दा फुटाणे यांनी मांडला होता. त्यानंतर आजतागायत महामंडळ, संयोजक आणि प्रकाशक यांची संयुक्त बैठक झाली नाही.
मराठी प्रकाशक परिषदेच्या सोमवारी रात्री झालेल्या बैठकीविषयी माहिती देताना कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी म्हणाले, ‘‘महामंडळ पदाधिकारी आणि संयोजकांनी माध्यमांद्वारे प्रकाशकांबाबत चुकीची माहिती दिली. प्रकाशक चर्चेला आले नाहीत, असे सांगण्यात आले. प्रकाशकांच्या अडचणींसंदर्भात पत्र देऊनही आजतागायत महामंडळाने किंवा संयोजकांनी आम्हाला चर्चेला बोलाविले नाही. काही दिवसांपूर्वी प्रकाशक आणि पुस्तकविक्रेते यांची संयुक्त बैठक झाली. घुमानला जायचे नाही, असा ठराव त्या बैठकीतच संमत करण्यात आला. हा प्रस्ताव सोमवारी प्रकाशक परिषदेच्या बैठकीत चर्चेला आला अन् घुमानला जायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला.’’ अध्यक्ष रमेश कुंदूर, कार्यवाह अनिल कुलकर्णी, कार्याध्यक्ष अरुण जाखडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी))
मुंबईत ४ दिवस पुस्तकांचे
४संमेलनाचे संयोजक आणि महामंडळाबरोबरची चर्चेची द्वारे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई प्रबोधन संस्था आणि मराठी प्रकाशक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत ‘४ दिवस पुस्तकांचे’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
४घुमानला जायचे नाही आणि संयोजक, महामंडळाशी चर्चा करायची नाही, असा प्रस्ताव पुणे विद्यार्थिगृह प्रकाशनचे व्यवस्थापक शेटे यांनी त्या बैठकीत मांडला होता. त्यावर सूचक म्हणून रमेश राठिवडेकर यांची, तर अनुमोदक म्हणून कुणाल ओंबासे यांची स्वाक्षरी असल्याचे कुलकर्णी म्हणाले.
४घुमान येथे होत असलेल्या संमेलनाला जायचे नाही, असा निर्णय झालेला असल्याने प्रकाशक किंवा पुस्तक विक्रेत्यांपैकी कुणी गेल्यास एकमेकांशी आर्थिक व्यवहार करायचा नाही, असाही निर्णय झाला आहे.