पं.पुरुषोत्तम कासलीकर यांचे निधन

By Admin | Updated: August 26, 2014 00:58 IST2014-08-26T00:58:03+5:302014-08-26T00:58:03+5:30

अमोलकचंद महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे माजी विभाग प्रमुख ख्यातकीर्त शास्त्रीय गायक पं.पुरुषोत्तम बाबाराव कासलीकर यांचे येथे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

Pt. Purushottam Kaslikar passes away | पं.पुरुषोत्तम कासलीकर यांचे निधन

पं.पुरुषोत्तम कासलीकर यांचे निधन

यवतमाळ : अमोलकचंद महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे माजी विभाग प्रमुख ख्यातकीर्त शास्त्रीय गायक पं.पुरुषोत्तम बाबाराव कासलीकर यांचे येथे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
शास्त्रीय संगीताचा परंपरागत वारसा लाभलेले पं.पुरुषोत्तम कासलीकर हे स्वरराज छोटागंधर्व यांचे पट्टशिष्य होते. त्यांचा जन्म यवतमाळात १८ आॅगस्ट १९२८ रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीत साधनेला प्रारंभ केला. स्वरराज छोटा गंधर्व, राम मराठे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू पं.मनोहरराव कासलीकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय व नाट्यसंगीताचे धडे घेतले. मूळ यवतमाळचे असलेल्या कासलीकरांनी शास्त्रीय संगीताचा अविरत प्रसार केला. अनेक शिष्य त्यांनी घडविले. यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी दिलेली सेवा अविस्मरणीय अशीच आहे. यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या म्युनिसिपल शाळेत त्यांनी ४० वर्षे गायनशाळा चालविली. तसेच गांधर्व विद्यालयाची शाखा स्थापन करून त्याचे प्रमुखपदही सांभाळले.
महाराष्ट्रासह अहमदाबाद, पोरबंदर, इंदोर या ठिकाणी त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजल्या. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलावंत होते. संगीत अलंकार या उपाधीने अलंकृत प.कासलीकर यांना २०११-१२ मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. विदर्भासह राज्यात त्यांचा मोठा शिष्य परिवार असून यवतमाळच्या संगीत क्षेत्रातील सर्वात मोठे नाव होते. पं.कासलीकर यांच्या मागे कन्या राजश्री सागर भानावत आहे. मंगळवारी २६ आॅगस्टला सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा दर्डानगरस्थित निवासस्थानावरून निघेल. पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने यवतमाळच्या संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Pt. Purushottam Kaslikar passes away