मनोरुग्ण, बेघरांच्या भुकेसाठी ‘सेवा संकल्प’ची धडपड
By Admin | Updated: October 3, 2015 03:40 IST2015-10-03T03:40:08+5:302015-10-03T03:40:08+5:30
रस्त्याच्या कडेला असहाय्य अवस्थेत पडलेले मनोरुग्ण, अनाथ आबालवृद्ध तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील निराधार रुग्णांच्या पोटाची काळजी कुणालाही नसते.

मनोरुग्ण, बेघरांच्या भुकेसाठी ‘सेवा संकल्प’ची धडपड
राजेश शेगोकार, बुलडाणा
रस्त्याच्या कडेला असहाय्य अवस्थेत पडलेले मनोरुग्ण, अनाथ आबालवृद्ध तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील निराधार रुग्णांच्या पोटाची काळजी कुणालाही नसते. दिवस उगवतो तो भुकेनेच आणि मावळतो तोसुद्धा उपाशीपोटीच. हे चित्र पाहून बुलडाणा आणि चिखली शहरातील काही तरुण हेलावले. निराधार, मनोरुग्ण उपाशी पोटी झोपणार नाहीत, हा संकल्प त्यांनी केला. यातूनच ‘सेवा संकल्प’ नावाची एक चळवळ उभी राहिली. या चळवळीने आज शेकडो लोकांना आधार दिला आहे.
५ मार्च २०१५ रोजी होळीच्या दिवशी अशा अनाथ, बेघर मनोरुग्णांना पोटभर जेवू घालायचा संकल्प नंदू आणि आरती पालवे या दाम्पत्याने केला. त्याला अविनाश चव्हाण, सुमेघा पालवे, सतीश उबाळे, अक्षय घुबे आणि निशिकांत ढवळे या तरुण मंडळींनी साथ दिली. या मंडळीने स्वखर्चातून रस्त्याच्या कडेला असलेल्या अनाथांना पुरणपोळीचे जेवण दिले. या सेवेला त्यांनी ‘सेवा संकल्प’ हे नाव दिले.
केवळ जेवणच नव्हे तर, मनोरुग्णांची आंघोळ, केशकर्तन, आरोग्य तपासणी आणि चांगले कपडे याकडेही त्यांनी लक्ष दिले. तरुणांचा हा सेवाभाव अनेकांच्या नजरेत आला आणि पाहता-पाहता मदतीचे शेकडो हात उभे राहिले.
बुलडाण्यात २० मनोरुग्ण, १५ बेघर, ४ अनाथ बालक, ८ अंध-अपंग आणि सामान्य रुग्णालयात ज्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून डबा येत नाही, अशा रुग्णांना दररोज जेवण ही मंडळी देतात. चिखलीत असे जवळपास २२ गरजू आहेत. त्यांचा स्वयंपाक करण्याची जबाबदारी ७० वर्षाच्या सुनंदाताई ढवळेंनी उचलली. वर्षभरापासून त्या नियमितपणे या तरुणांना मदत करतात.
बाबा आमटे यांना श्रद्धास्थान मानून सुरू असलेल्या या सेवेला
डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे,डॉ. रवींद्र व डॉ. स्मिताताई कोल्हे, ‘गोधडीवाली बाई’ नीलम मिश्र अशा अनेक मान्यवरांनी सलाम केला आहे.