मनोरुग्ण निघाला १६० एकराचा मालक
By Admin | Updated: September 20, 2016 02:05 IST2016-09-20T02:05:04+5:302016-09-20T02:05:04+5:30
वाढलेली दाढी व केस, फाटलेले कपडे अशा अवतारात कित्येक महिन्यांपासून तो वेड्यासारखा फिरत होता़

मनोरुग्ण निघाला १६० एकराचा मालक
नवनाथ शिंदे,
पिंपरी- वाढलेली दाढी व केस, फाटलेले कपडे अशा अवतारात कित्येक महिन्यांपासून तो वेड्यासारखा फिरत होता़ पुण्यातील जुना बाजाराच्या पुलाखाली एका पिशवीसह आणि काही सामानासह रात्रीच्या मुक्कामाला असायचा.विमनस्क अवस्थेत भटकत असताना फ रासखाना पोलिसांनी त्याची माहिती एका सामाजिक संस्थेला दिली़ संस्थेने उपचारासाठी त्याला येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले़
दीड महिन्याच्या उपचारानंतर तो बरा झाला़ बोलू लागला़ मी इथे कसा, याची विचारणा करू लागला़ तपासाअंती तो तामिळनाडूतील १६० एकर जमिनीचा मालक असल्याचा उलगडा झाला. अखेर त्याच्या परिवाराला तो मिळाला. स्मृतिभ्रंश झालेला शिक्षित तरुण पुन्हा एकदा कुटुंबासह आपल्या राज्यात परतला़ व्यंकटेश नायडू (रा़ तामिळनाडू ) असे त्या कुबेराचे नाव आहे़
शेतीची आवड नसल्याने आठ वर्षांपूर्वी तामिळनाडू राज्यातून तो पुण्यात नोकरीला आला होता़ काही दिवस नोकरी केल्यानंतर मानसिक ताणामुळे त्याचा स्मृतिभ्रंश झाला आणि तो रस्त्यांवर वेड्यासारखा फि रू लागला़ कित्येक महिने एकाच पुलाखाली राहत असल्याने शेजारील लोक आणि परिसरातील व्यावसायिकांशी त्याची गट्टी झाली होती़ काही दिवसांनी फ रासखाना पोलिसांनी स्माइल ग्रुपचे संचालक योगेश मालखरे यांना त्याची माहिती दिली़ मालखरेंनी त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल केले़ उपचारानंतर त्याने स्वत:चे नाव, घराचा पत्ता सांगितला़ त्यानंतर पुणे पोलिसांनी तामिळनाडूतील पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या कुटुंबाला माहिती दिली़
नायडूच्या कुटुंबाने पुण्यातील ओळखीच्या लोकांना संपर्क साधून अधिक माहिती मिळवली आणि ते पुण्यात दाखल झाले़ सुमारे आठ वर्षांपासून घरातून निघून आलेला आपला भाऊ पाहताच त्याला घ्यायला आलेल्या बहीण आणि भावाला अश्रूंचा पाझर फु टला़
अनेक दिवसांनंतर आपण बोलू लागलो, परिवाराची झालेली भेट आणि स्मृतिभ्रंश विकारातून बरा होऊन थेट कुटुंबाशी संवाद याचा आनंद व्यंकटेशच्या डोळ्यात दिसत होता़रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर व्यंकटेशने स्माइल ग्रुपच्या सदस्यांसह ज्या ठिकाणी तो अनेक वर्षे पुलाखाली स्मृतिभ्रंश झाल्याने राहत होता तेथे जाऊन त्याला जेवण देणाऱ्या लोकांना भेटला़
>वेड्यासारखा भटकणारा व्यंकटेश आता
बरा होऊन त्याच्या गावाला जाणार असल्याने सुमारे २०० ते २५० जण त्याला भेटायला
आले होते़ काही दिवसांपूर्वी तामिळनाडूला जाताना त्याने हात जोडत नमस्कार करीत पुण्याचा निरोप घेतला़ तो अनेक वर्षे पुलाखाली स्मृतिभ्रंश झाल्याने राहत होता. स्माईल ग्रुपच्या सदस्यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. उपचारानंतर तो बरा झाल्यानंतर स्वगृही परतला.