शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढणार
By Admin | Updated: January 7, 2017 02:51 IST2017-01-07T02:51:32+5:302017-01-07T02:51:32+5:30
जिल्हा परिषदेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार आहे.

शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र लढणार
नेरळ : आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस पक्षालाही जागावाटपात प्राधान्य देणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठनेते चंद्रकात जयवंत यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेरळ येथील शेतकरी भवनमध्ये शुक्र वारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी चंद्रकांत जयवंत यांनी ही माहिती दिली. तसेच येत्या १२ तारखेला पुणे एक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक संघटना सहभागी होणार आहेत. त्यामध्ये मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, अशा अनेक संघटना शेतकरी कामगार पक्षात विलीन होत आहेत. पुरोगामी विचारांचे सर्व लोक एकत्र येऊ लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे.
पुरोगामी विचारांचे अनेक लोक शेतकरी कामगार पक्षात येत असून, शेतकरी कामगार पक्षाची धैर्य-धोरणे समजून, ते या संघटना शेतकरी कामगार पक्षात विलीन होण्यास तयार झाले आहेत. पुणे येथे १२ जानेवारी हा मेळावा असून, या मेळाव्याच्या तयारीसाठी जयंत पाटील १३ जानेवारी रोजी कर्जत तालुक्यात येणार असल्याचे चंद्रकांत जयवंत यांनी सांगितले.
या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रामचंद्र बदे, नारायण तरे, राजू हजारे, नियाज पोईलकर, पुंडलिक शिनारे, संतोष राऊत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)