लोंढे रोखण्यासाठी तरतूद
By Admin | Updated: March 30, 2015 04:30 IST2015-03-30T04:30:07+5:302015-03-30T04:30:07+5:30
राज्याच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बृहन्मुंबईतील लोंढे रोखण्याकरिता आर्थिक तरतूद केली आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेवर कुरघोडी करण्याकरिता भाजपाने
लोंढे रोखण्यासाठी तरतूद
मुंबई : राज्याच्या २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बृहन्मुंबईतील लोंढे रोखण्याकरिता आर्थिक तरतूद केली आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेवर कुरघोडी करण्याकरिता भाजपाने केलेल्या या खेळीवरून भाजपाला लक्ष्य करण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पार्टीने दिला आहे.
वित्तमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात याचा कुठेही उल्लेख नव्हता. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर हा विषय काढला म्हणून ही गोष्ट उजेडात आली. सभागृहात बोलताना शेलार यांनी सामान्य
प्रशासन विभागाच्या विषयपत्रिकेत कार्यासन क्र. २९ (अ)मध्ये बृहन्मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना रोखण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना या शीर्षकाखाली आर्थिक तरतूद केली असल्याचा उल्लेख केला.
ही तरतूद कशासाठी केली आहे, यापूर्वी अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही; मग हे सरकार या हेडखाली कोणत्या उपाययोजना करणार आहे, यापूर्वीच्या सरकारने असा कार्यक्रम राबवला
होता का, अशी विचारणा शेलार यांनी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात शेलार यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांवर कोणतेही भाष्य केले नाही.
मुंबईतील लोंढे रोखणे हा वस्तुत: आर्थिक तरतूद करण्याचा नव्हे, तर कायदा करण्याचा विषय आहे. मात्र येत्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेच्या हातचा परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा हिसकावून घेण्याकरिता भाजपाने ही खेळी खेळली आहे. आता भाजपाच्या या खेळीला कडाडून विरोध होऊ लागला आहे. (विशेष प्रतिनिधी)