वयोवृद्ध पित्यास निर्वाह भत्ता द्यावा!
By Admin | Updated: January 6, 2016 02:11 IST2016-01-06T02:11:36+5:302016-01-06T02:11:36+5:30
वयोवृद्ध वडिलाच्या उदरनिर्वाहासाठी चार मुलांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दरमहा चार हजार रुपये निर्वाहभत्ता द्यावा, असा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शनिवारी दिला.

वयोवृद्ध पित्यास निर्वाह भत्ता द्यावा!
अकोला : वयोवृद्ध वडिलाच्या उदरनिर्वाहासाठी चार मुलांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दरमहा चार हजार रुपये निर्वाहभत्ता द्यावा, असा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शनिवारी दिला.
अकोला शहरानजीकच असलेल्या खडकी बु. येथील वयोवृद्ध नागरिक ज्ञानेश्वर पांडुरंग ताजणे (७०) यांना सुनील (३५), महादेव (४०), चंदू (२५) व मिलिंद (२२) ही चार मुले आहेत. या मुलांनी वडिलांना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. ज्ञानेश्वर ताजणे यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यांच्याजवळ उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा २००७ नुसार चारही मुलांविरुद्ध उपविभागीय अधिकऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
अन्न, वस्त्र, निवारा तसेच औषधोपचाराकरिता दरमहा दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी. आपला छळ करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी तक्रारअर्जात केली होती. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. वयोवृद्ध वडिलांच्या उदरनिर्वाहासाठी चारही मुलांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दरमहा चार हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद उपविभागीय अधिकारी खडसे यांनी दिली. (प्रतिनिधी)