पोलीस नसल्यास माहिती द्या
By Admin | Updated: April 11, 2015 05:46 IST2015-04-11T05:46:38+5:302015-04-11T05:46:38+5:30
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळवा स्थानकात लोकल येताच महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातून मोबाइल चोरून नेण्याची घटना घडली.

पोलीस नसल्यास माहिती द्या
मुंबई : गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळवा स्थानकात लोकल येताच महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या हातातून मोबाइल चोरून नेण्याची घटना घडली. या घटनेमुळे महिलांचा रात्रीचा प्रवास सुरक्षित नसल्याचे उघड झाले. या घटनेनंतर या डब्यात रेल्वे पोलीस (जीआरपी) होते की नव्हते असा नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर जीआरपीने महिला आरक्षित डब्यात पोलीस नसल्यास नियंत्रण कक्ष किंवा महिला निर्भया हेल्पलाइनला तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मनीषा मोहिते या डोंबिवली येथे राहतात. ८ एप्रिल रोजी मनीषा यांनी मध्यरात्री कुर्ला येथून ठाणे लोकल पकडली आणि त्या मुलुंड स्थानकात डोंबिवलीला जाणारी लोकल पकडण्यासाठी उतरल्या. त्यांनी मुलुंड स्थानकातून मध्यरात्री १.२0 वाजता कर्जत धीमी लोकल पकडली आणि मोटरमनच्या शेजारील महिला डब्यातून त्या प्रवास करू लागल्या. ही लोकल मध्यरात्री १.३५ वाजता कळवा स्थानकात येथे येताच एक चोर मोबाइल चोरण्याच्या उद्देशाने थेट या महिला डब्यात चढला आणि त्याने मनीषा यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. त्याला मनीषा यांनी विरोध करताच चालत्या लोकलमधून कळवा स्थानकात उतरत चोराने मोबाइल जबरदस्तीने चोरून नेला. यानंतर ठाणे रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या डब्यात पोलीस नसल्यानेच ही घटना घडल्याचे समोर आले. मात्र या घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून त्वरित खुलासा करण्यात आला. सीएसटी-कर्जत लोकल ही साडे बारा वाजता सीएसटीवरून सुटते. त्या वेळी लोकलमधील ६व्या महिला डब्यात जीआरपी पोलीस, ९व्या डब्याकरिता होमगार्ड आणि १२व्या डब्याकरिता जीआरपी आहेत आणि ते सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले आहे. आता रात्रीच्या वेळी प्रवास करताना महिला सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतात त्याच डब्यातून महिलांनी प्रवास करावा. आरक्षित डब्यात पोलीस नसल्यास त्याबाबत तत्काळ जीआरपी निर्भया व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांक ९८३३३१२२२२ किंवा २३७५९२८३ या नियंत्रण कक्षावर संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.