दुष्काळग्रस्त स्थलांतरितांची माहिती द्या - हायकोर्ट
By Admin | Updated: June 9, 2016 06:04 IST2016-06-09T06:04:37+5:302016-06-09T06:04:37+5:30
मुंबई व शेजारच्या जिल्ह्यांत किती जण स्थलांतरित झाले, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची तपशिलवार माहिती देण्याचे निर्देश बुधवारी राज्य सरकारला दिले.

दुष्काळग्रस्त स्थलांतरितांची माहिती द्या - हायकोर्ट
मुंबई : दुष्काळी भागातून मुंबई व शेजारच्या जिल्ह्यांत किती जण स्थलांतरित झाले, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने याची तपशिलवार माहिती देण्याचे निर्देश बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत, याचीही माहिती १० जूनपर्यंत देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
दुष्काळामुळे नांदेडमधून मुंबई व ठाण्यात आलेल्या नागरिकांना अन्न, पाणी व निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. उच्च न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी दुष्काळी भागातून आलेल्या निर्वासितांना अन्न, पाणी आणि निवाऱ्याची सोय करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने असे किती लोक मुंबई व ठाण्यात आले आहेत, अशी विचारणा सरकारकडे केली. (प्रतिनिधी)