बहुमत सिद्ध करा नंतरच सरकार चालवा
By Admin | Updated: November 24, 2014 01:14 IST2014-11-24T01:14:48+5:302014-11-24T01:14:48+5:30
राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

बहुमत सिद्ध करा नंतरच सरकार चालवा
फडणवीस सरकारवर चव्हाण यांचे टीकास्त्र
नागपूर : राज्यातील भाजप सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. फडणवीस सरकारने आधी बहुमत सिद्ध करावे, नंतरच सरकार चालवावे अशी मागणी करीत हिवाळी अधिवेशनात काँग्रेस राज्य सरकारला घाम फोडणार असल्याचे संकेत चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिले.
केवळ आवाजी मतदानाने सत्तेत आलेले राज्यातील भाजपचे सरकार घटनाबाह्य असल्याचे मत सर्वोच्च माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी शनिवारी व्यक्त केले होते. याचा दाखला देत चव्हाण म्हणाले, विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपने सभागृहाची दिशाभूल केली. यावेळी विधानसभेतील कामकाजाचा क्रम अध्यक्षांनी सभागृहाला विश्वासात न घेता बदलला. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशीचे ‘ व्हिडिओ क्लिपिंग’ का उपलब्ध करून दिले जात नाही, असा सवाल चव्हाण यांनी यावेळी केला. राज्यपालांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना १५ दिवसांत बहमुत सिद्ध करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस तटस्थ, शिवसेना आणि काँग्रेस विरोधात असताना बहुमतासाठी लागणारा १४५ चा आकडा सरकारजवळ नव्हता, त्यामुळे गोंधळ निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन हेतूपुरस्सर करण्यात आल्याचे सांगत हिवाळी अधिवेशनात आणखी काही आमदार निलंबित करून कृत्रिम बहुमताचा आकडा गाठण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली. विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने केलेल्या कृतीची माहिती राज्यपालांना देण्यात आली आहे.
मात्र त्यावर काहीएक झाले नसल्याने या प्रश्नावर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रपतींची वेळ मागितल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विरोेधी पक्षात कोण ?
विरोेधी पक्षात कोण आणि सरकारसोबत कोण हे राज्यातील जनतेला कळण्यासाठी आधी सरकारने मतदानाने बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीने सरकारला टेकू दिला आहे तर शिवसेना सत्तेच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची सक्षम भूमिका वठवेल, असे चव्हाण यांनी एका प्रश्नांच्या उत्तरात स्पष्ट केले.
फडणवीस-गडकरी यांच्यात विसंगती
राज्यात महिनाभरात एलबीटी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. मात्र राज्य मंत्रिमंडळाने एलबीटी रद्द करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे एलबीटीसंदर्भात दोन्ही नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यात विसंगती असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जवखेडे हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा
पाथर्डी येथील जवखेडे हत्याकांडाचा तपास संथगतीने सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस आतापर्यंत जवखेडे येथे गेले नाहीत. तपासाला गती देण्यासाठी या प्रकरणाची चौैकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी चव्हाण आणि ठाकरे यांनी यावेळी केली.