मतदान घेऊन पुन्हा बहुमत सिद्ध करावे
By Admin | Updated: November 15, 2014 02:35 IST2014-11-15T02:35:22+5:302014-11-15T02:35:22+5:30
विश्वासदर्शक ठरावादरम्यान संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करण्यात आल्याने राज्यातील भाजपा सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे भाजपाला मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत,

मतदान घेऊन पुन्हा बहुमत सिद्ध करावे
मुंबई : विश्वासदर्शक ठरावादरम्यान संवैधानिक तरतुदींचे उल्लंघन करण्यात आल्याने राज्यातील भाजपा सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे भाजपाला मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी
आग्रही मागणी काँग्रेसने शुक्रवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. या वेळी पक्षाच्या वतीने राज्यपालांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान घेण्यात आले. त्या वेळी फक्त ठरावाच्या बाजूने असलेल्यांच्या आवाजाचीच दखल घेण्यात आली व विरोधी आवाजाची नोंदच घेण्यात आली नाही. त्यामुळे ध्वनिमताची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले.
काँग्रेसच्या सदस्यांनी विहित वेळेत व तातडीने मतविभाजनाची मागणी केली. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांच्या निदशर्नास आणून दिले. या पाश्र्वभूमीवर राज्यपालांनी भाजपाला तातडीने पुन्हा प्रत्यक्ष मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत आणि तोवर या सरकारचे सर्व धोरणात्मक निर्णय स्थगित करून त्यांना नवे निर्णय घेण्यास प्रतिबंध घालावा, अशीही मागणी काँग्रेसने केली. (प्रतिनिधी)
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या ठरावाच्या वेळी झालेल्या गोंधळाकडे राज्यपालांचे लक्ष वेधणो इतकाच उद्देश होता, असे सांगतानाच याप्रसंगी राज्यपालांना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल शिष्टमंडळाने खेद व्यक्त केला.