राज्यात निषेध मोर्चांना हिंसक वळण!
By Admin | Updated: November 4, 2014 02:36 IST2014-11-04T02:36:52+5:302014-11-04T02:36:52+5:30
पोलीस हतबल अन् बेखबर पदाधिकाऱ्यांची भाषणे आणि मोर्चेकऱ्यांच्या घोषणाबाजीतून मोर्चाला हिंसक वळण लागण्याची चिन्हे दिसत होती़

राज्यात निषेध मोर्चांना हिंसक वळण!
नाशिक/जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ नाशिक, जळगाव आणि सांगलीत विविध संघटनांनी सोमवारी काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले़ यात अनेक वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली़ दरम्यान कोल्हापूरमध्ये श्रमिक मुक्ती दलातर्फे मोर्चा काढण्यात आला.
पोलीस हतबल अन् बेखबर पदाधिकाऱ्यांची भाषणे आणि मोर्चेकऱ्यांच्या घोषणाबाजीतून मोर्चाला हिंसक वळण लागण्याची चिन्हे दिसत होती़ मात्र, याबद्दल पोलीस पूर्णपणे बेखबर असल्याचे दिसून आले़ फुले मार्केटजवळ मोर्चाला हिंसक वळण लागले़ मोर्चेकऱ्यांना येथेच अडविले असते, तर नासधुस रोखता आली असती, अशी चर्चा रहिवाशांत सुरू होती़
नाशकात बसेसवर दगडफेक
जातीय अत्याचारविरोधी कृती समिती व विविध संघटनांनी काढलेल्या धिक्कार मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दरम्यान, कार्यकर्त्यांनी मोर्चा मार्गावरील दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला, तसेच महात्मा गांधी रोडवर दोन दुचाकी ढकलून दिल्या़ यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ मोर्चाच्या समारोपानंतर मात्र नवीन सीबीएस परिसरात कार्यकर्त्यांनी तीन बसेसवर दगडफेक करीत मोटरसायकलींची तोडफोड केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)