आचारसंहितेला विरोध
By Admin | Updated: July 31, 2016 01:46 IST2016-07-31T01:46:36+5:302016-07-31T01:46:36+5:30
नगरसेवकांच्या शिस्तीचा लगाम आयुक्तांच्या हातात देण्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी आज विरोध दर्शविला.

आचारसंहितेला विरोध
मुंबई : नगरसेवकांच्या शिस्तीचा लगाम आयुक्तांच्या हातात देण्यास सर्वपक्षीय गटनेत्यांनी आज विरोध दर्शविला. बेशिस्त नगरसेवकांवर कारवाई करणारे हे महापौरांचे अधिकारी आहेत. समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करेल, असा निर्णय गटनेत्यांनी आज घेतला. मात्र, सभागृहात मोबाइल जॅमर लावणे, नगरसेवकांची तपासणी आणि अन्य बैठकांना उपस्थित राहण्यास प्रतिबंध या आयुक्तांच्या शिफारशी फेटाळण्यात आल्या आहेत.
देवनार डम्पिंग ग्राउंडवर लागणाऱ्या आगीच्या प्रश्नावर पालिकेच्या महासभेत चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाच्या एका नगरसेवकाने महापौरांच्या दिशेने कचरा टाकला. कागदाचे बोळे फेकणे, शिट्या वाजवणे असे प्रकार वारंवार घडतात. याची दखल घेऊन आयुक्त अजय मेहता यांनीच नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. ही आचारसंहिता सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज चर्चेसाठी आली होती.
मात्र, नगरसेवकांवर कारवाईचा अधिकार आयुक्तांना देण्यास सर्वच पक्षीय गटनेत्यांनी विरोध दर्शविला. ही लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आहे. अशी नाराजी गटनेत्यांनी व्यक्त केली. महापौरांनी निलंबन केल्यानंतरही सभागृहाबाहेर जाण्यास नकार देणाऱ्या नगरसेवकांना बाहेर काढण्यासाठी मार्शल ठेवण्यास हरकत नाही. मात्र, नगरसेवकांची झडती घेऊन सभागृहात प्रवेश देणे हे अपमानास्पद आहे असे मत गटनेत्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
>महापौरांची समिती ठरवणार आचारसंहिता
महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करेल. यावर सभागृहात चर्चा होईल. नगरसेवकांनी याविषयी अनुकूलता दर्शवल्यानंतर नगरविकास खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले.
>मोबाइल जॅमर नकोच
सभागृहात चर्चेदरम्यान खणखणणाऱ्या मोबाइलमुळे कामकाजात व्यत्यय येतो. वारंवार सूचना करूनही नगरसेवक ऐकत नाहीत. त्यामुळे मोबाइल जॅमर लावण्याची शिफारस आयुक्तांनी केली आहे. मात्र, नगरसेवकांना अनेक महत्त्वाचे फोन येत असतात. त्यांच्या विभागात इर्मजन्सी येऊ शकते, अशा वेळी त्यांचा मोबाइल बंद असेल तर त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचणार नाही. त्यामुळे जॅमर नकोच असा युक्तिवाद गटनेत्यांनी मांडला.