पाकड्यांना संरक्षण; बलात्कारी मोकाट - उद्धव ठाकरेंची केजरीवालांवर टीका
By Admin | Updated: October 19, 2015 08:55 IST2015-10-19T08:53:08+5:302015-10-19T08:55:00+5:30
पाकिस्तानी कलावंताचा बालही बाका होऊ नये म्हणून केजरीवाल यांच्या ‘आप’चे कार्यकर्ते रण माजवणार आहेत, मग हाच विडा ते बलात्कार्यांविरोधात का उचलत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

पाकड्यांना संरक्षण; बलात्कारी मोकाट - उद्धव ठाकरेंची केजरीवालांवर टीका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - पाकिस्तानी कलावंताचा बालही बाका होऊ नये, त्यांचा कार्यक्रम सुरळीत पार पडवा म्हणून केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाचे शेकडो कार्यकर्ते रण माजवणार आहेत, मग हाच विडा ते महिला अत्याचार व बलात्कार्यांविरोधात का उचलत नाहीत असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे.
दिल्लीत गुलाम अली खान यांचा कार्यक्रम आयोजित करणा-या अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्धव यांनी 'पाकड्यांना संरक्षण; बलात्कारी मोकाट' या सामनाती अग्रलेखातून हल्ला चढवला आहे.
पाकड्यांचे रक्षण करायला ‘आप’ला पोलिसांची अजिबात गरज नाही, ते समर्थ आहेत. पण दिल्लीतील गुन्हेगारी, मोकाट सुटलेल्या बलात्कार्यांना वेसण घालण्यासाठी मात्र त्यांना पोलीस दल हाती हवं असून त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारशी झगडा सुरू केला आहे. हे सोयीचे राजकारण असल्याची टीका उद्धव यांनी केली आहे. महिलांवरील अत्याचार व बलात्कारांपेक्षा 'आप'ला पाकड्यांचे संरक्षण महत्त्वाचे वाटत असल्यानेच दिल्लीकर जनता कपाळास बाम चोळत बसली आहे, असेही उद्धव यांनी म्हटले आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल व केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. त्याचवेळी दिल्लीत दोन चिमुरड्यांवर शुक्रवारी रात्री बलात्कार झाला. देशाच्या राजधानीत वारंवार अशा घटना घडत आहेत व जगात त्यामुळे आपली लाज जात आहे. बलात्काराची राजधानी अशी बदनामी सुरू आहे. काही राजकीय लोक म्हणतात त्याप्रमाणे ही घटना किरकोळ नसून भयंकर आहे. दिल्लीत ‘आप’ पक्षाचे पूर्ण बहुमताचे राज्य आहे, पण पोलिसांचे नियंत्रण केंद्र सरकारकडे म्हणजे नायब राज्यपालांकडे आहे. ‘‘दिल्लीचे पोलीस खाते मुख्यमंत्र्यांच्या हवाली करा, हे बलात्कार वगैरे बंद करतो’’ असे आव्हान केजरीवाल यांनी दिले. केजरीवाल यांचा अर्धा वेळ केंद्र सरकारशी भांडण्यात व नायब राज्यपालांना खरेखोटे सुनावण्यात जातो. उद्या पोलीस खाते त्यांच्या हातात आले तरी फार मोठा प्रकाश पडण्याची चिन्हे दिसत नाहीत.
- आरोग्य खाते ‘आप’ सरकारच्या हाती आहे, पण दिल्लीत डेंग्यूने कहर करून अनेकांना प्राण गमवावे लागले. जे सरकार ‘डेंग्यू’ मच्छरांचा बंदोबस्त करू शकले नाही ते गुंड, बदमाश, बलात्कारी, अतिरेक्यांचा बंदोबस्त कसा करणार? हा प्रश्न आहे. दिल्लीतील पोलीस दल हातात नाही म्हणून केजरीवाल व त्यांचे मंत्री हात चोळत बसले आहेत. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहराची सत्ता ‘मटका’ लागल्याप्रमाणे ‘आप’कडे गेली आणि दिल्लीकरांनी एकप्रकारची डोकेदुखीच ओढवून घेतली. आता कपाळाला बाम लावण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय त्यांच्याकडे आहे?
- केजरीवाल व त्यांचे चेले केंद्राकडे पोलिसांवरील नियंत्रणाची मागणी करीत आहेत, पण हातात पोलीस असले काय- नसले काय, केजरीवाल सर्व काही करू शकतात. मुंबईत शिवसैनिकांनी पाकिस्तानी गुलाम अलींचा कार्यक्रम एका राष्ट्रीय भावनेने रोखला, मात्र केजरीवाल यांनी गुलाम अली यांना खास ‘मेहमान’ बनवून त्यांच्या गझलांचा कार्यक्रम दिल्लीत आयोजित केला आहे. गुलाम अलींच्या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे माहीत असतानाही केजरीवाल यांनी ही कळ काढली आहे.
- केजरीवाल म्हणतात, पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था ठेवली नाही तर ‘आप’चे स्वयंसेवक व कार्यकर्ते गुलाम अलींचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून नेटाने काम करतील. म्हणजे ‘आप’ लोग पाकड्या गुलाम अलींचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून ‘फिल्डिंग’ लावणार आहेत. केजरीवाल यांनी हा जो पाकनिष्ठेचा विडा उचलला आहे त्यामुळे देशाच्या दुष्मनांना बळ मिळणार आहे. पाकड्या कलावंतांचा बालही बाका होऊ नये म्हणून केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाचे शेकडो कार्यकर्ते रण माजवणार आहेत. मग हाच विडा ते महिला अत्याचार व बलात्कार्यांविरोधात का उचलत नाहीत?