देशाच्या संरक्षणाबरोबर पर्यावरण रक्षणही - जावडेकर
By Admin | Updated: June 2, 2014 00:14 IST2014-06-01T21:08:13+5:302014-06-02T00:14:03+5:30
माहिती व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांचे आश्वासन

देशाच्या संरक्षणाबरोबर पर्यावरण रक्षणही - जावडेकर
पुणे : गेल्या काही वर्षांत पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली देशाच्या संरक्षणासह हजारो प्रकल्पांची कामे प्रलंबित आहेत. परंतु, देशाच्या सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्यात येईल, त्याचवेळी पर्यावरण रक्षणाची काळजी घेऊन विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन माहिती व पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले.
प्रकाश जावडेकर यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच आज पुण्यात आले. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष व खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, गटनेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत जावडेकर यांचा भाजप कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच मंत्र्यांना लोकोपयोगी कामे प्रधान्याने हाती घेण्यास सांगितले आहेत. तसेच, प्रत्येक खात्याचा कारभार पारदर्शक व वेगवान होण्यासाठी मंत्रिगट रद्द केले आहेत. मंत्रिगट नसले तरी दोन खात्याचे मंत्री एकत्र बसून निर्णय घेतील, त्यामध्ये कोणालाही अंहकाराची बाधा नाही. ऑनलाईन प्रकल्प प्रस्ताव स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, नवीन पद्धतीने कारभार करण्यासाठी अभ्यास सुरू आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
-------------
पुण्यात नदीसुधारणाला प्राधान्य
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील नदीसुधारणाचे काम सुरू आहे. अहमदाबादमध्ये साबरमती नदी सुधारणेचे काम पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणे पुण्यातील नदीसुधारणेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. शिवाय पुण्यातील प्रलंबित प्रश्नांविषयी आणि राज्यातील पर्यावरण विषयक काही प्रश्नांविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
------------------