वसुंधरेचे रक्षण हेच खरे राष्ट्रीयत्व
By Admin | Updated: April 22, 2015 04:03 IST2015-04-22T04:03:56+5:302015-04-22T04:03:56+5:30
भारतीय स्वातंत्र्यानंतर केवळ ६० वर्षांचा आढावा घेतला तरी आपण विकासाच्या वाटचालीत आघाडीवर आहोत, ही अभिमानाची गोष्ट आहे़

वसुंधरेचे रक्षण हेच खरे राष्ट्रीयत्व
भारतीय स्वातंत्र्यानंतर केवळ ६० वर्षांचा आढावा घेतला तरी आपण विकासाच्या वाटचालीत आघाडीवर आहोत, ही अभिमानाची गोष्ट आहे़ परंतु भारतीय स्वातंत्र्याकरिता ज्या प्राणपणाने आपण संघटितपणे ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला त्याच पद्धतीने वर्तमानातील पर्यावरण व प्रदूषणविषयक प्रश्नांबाबत व्यापक मानसिक परिवर्तनातून समृद्ध वसुंधरेच्या रक्षणासाठी लढा देण्याची नितांत गरज आहे.
गेल्या सहा दशकांमध्ये प्रगतीच्या वाटेवर घोडदौड करीत असताना आपण निसर्गाची नकळतपणे हानी केली. उदाहरणच द्यायचे झाले तर होळी उत्सवात आपण जिवंत झाडे आजही तोडतो. वास्तविक पाहता भारतीय सण, उत्सव आणि परंपरा या निसर्गाशी समृद्ध नाते जपणारे उत्सव म्हणून जगभरात गौरविले जातात. भारतीय परंपरेला अनेक वर्षांचा पौराणिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा आहे. पाचशे वर्षांपूर्वी संत तुकारामांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ अशी शिकवण दिली, तर तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी रयतेला लिहिलेल्या आज्ञापत्रात झाडे तोडल्यास नवीन वृक्षारोपण करण्याची तंबी दिली. ज्या काळात संपूर्ण राज्य वनश्रीने नटलेलं होतं त्या काळात संत तुकाराम किंंवा छत्रपती शिवरायांचा द्रष्टेपणा किती अलौकिक होता याची प्रचिती येते.
आपण इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानात ती जाणीव समृद्ध करून उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याची नितांत गरज आहे. शासनाने पर्यावरणरक्षण व प्रदूषण नियंत्रणाकरिता अनेक कायदे केले आहेत. या कायद्यांची अंमलबजावणी करण्याकरिता शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, पण यामध्ये सर्वसामान्य माणसाचा सकारात्मक सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ आपण आपलं स्वत:चं राहात घर दररोज दोन ते तीन वेळा स्वच्छ करतो; मात्र तो कचरा बिनदिक्कतपणे रस्त्यावर फेकून देताना हे शहर किंंवा हे गाव आपलं घर आहे ही भावना आपण विसरून जातो. आपण अनेक वेळा हे दृष्य पाहात असतो की पाण्याचा अतिरिक्त वापर ही गोष्ट आपल्याइतकी अंगवळणी पडलेली असते, की कित्येक घरात रात्री भरून ठेवलेली पाण्याची बादली सकाळी पाणी शिळे झाले म्हणून ओतून टाकली जाते. अशा हजारो घरांतील पाण्याच्या बादल्या न ओतता जर त्या पाण्याचा आपण काटकसरीने वापर केला, तर उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अजिबात भासणार नाही. आपल्या शहरात गावांजवळ उपलब्ध असलेले पाणी आपल्या गरजेपेक्षा कित्येक पटीने अधिक उपलब्ध आहे. पण पाणी वापराचे योग्य नियोजन कोण करणार, हाच प्रश्न आपण एकमेकांना विचारत असतो.
शासन ही समाजाची विश्वस्त संस्था आहे आणि आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी समाजाचे विश्वस्त आहेत. पण शासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेल्या पर्यावरणविषयक योजना, चळवळी यांच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा व्यापक सहभाग अत्यंत आवश्यक आहे अन्यथा कितीही कायदे, कितीही उपाययोजना केल्या तरी सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाशिवाय पर्यावरण आणि प्रदूषणाचा प्रश्न सोडविणे कठीण होऊन जाईल. राज्याचे पर्यावरण मंत्री मा़ना.श्री.रामदास कदम यांनी ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर तत्काळ बंदी करून दोषी आस्थापना, व्यापारी यांच्यावर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सन २००५ साली मुंबई शहरात आलेल्या महापुराचे मुख्य कारण प्लास्टिक पिशव्या होत्या, हे स्पष्ट झाले आहे. आज २००५ नंतर २०१४ पर्यंत मुंबई शहरातील नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या वापरणे पूर्णपणे बंद करणे गरजेचे होते. पण याबाबत सर्वसामान्य नागरिक सामूहिक सामाजिक जबाबदारी किती पाळतात, याचा विचार करण्याची गरज आहे. मा.रामदास कदम यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने प्लास्टिक पिशव्या किंंवा मिठी नदीच्या स्वच्छतेकरिता हाती घेतलेली मोहीम निश्चितच स्वागतास्पद आहे. पण याकरिता आपण नागरिक म्हणून त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
आज भारतातून परदेशात गेल्यानंतर आपण त्या देशांच, तिथल्या स्वच्छतेच, निसर्गाच तोंड भरून कौतुक करतो; पण एक भारतीय नागरिक म्हणून ती व्यक्तिगत सामाजिक जबाबदारी आपण किती पाळतो, हा यक्षप्रश्न आहे. मानव हा वसुंधरेला वरदान आहे. मानवाने बुद्धीच्या बळावर आमूलाग्र क्रांती केली, पण यातून निसर्गाचा ऱ्हास होत आहे याची काळजी मात्र केली नाही. आपण अभिमानाने म्हणतो की वाघ म्हातारा झाला म्हणून गवत खात नाही, कोकिळेने तिचे अन्न सोडून निसर्गावर हल्ला केला नाही, गाय-बैल यांनी चारा सोडून शेळ्या-मेंढ्या खाल्ल्या नाहीत; म्हणजे या मुक्या प्राण्यांनी निसर्गाचे चक्र अबाधित राहण्यासाठी आपली जीवनशैली बदलली नाही, पण मानवाने मात्र आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळे विश्वच पादाक्रांत केले आणि निसर्गावर आक्रमण करीत आपली विकासाची भूक भागविणे चालू आहे. आपण मात्र आज हा विचार करीत नाही, की ज्या वसुंधरेने मला सर्व काही दिलं त्या वसुंधरेच्या रक्षणासाठी मी काय केलं?
अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी दृढ निश्चय केला, त्याला प्रयत्नांची जोड दिली तर आपण हे चित्र निश्चितच बदलू शकू. आपण भारतीय आहोत याचा अर्थ २६ जानेवारी किंंवा १५ आॅगस्ट या राष्ट्रीय दिवशी वंदे मातरम् किंंवा राष्ट्रगीत या दोन दिवसांपुरतं आपलं भारतीयत्व सीमित राहू नये, याचं भान आपण बाळगलं पाहिजे. आपण भारतीय आहोत म्हणजे आपण पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, विजेच्या बचतीस अग्रक्रम दिला पाहिजे. नैसर्गिक संसाधने, ऊर्जास्रोत यांचा कमीत कमी वापर म्हणजेच भारतीयत्व, ज्या प्लास्टिक पिशव्यांमुळे निसर्गाची हानी होते याचा वापर बंद करणे हे खरे राष्ट्रप्रेम़ घर स्वच्छ करताना आपले गाव आपले शहर स्वच्छ ठेवणे हे आद्य कर्तव्य हीच खरी मातृभूमीची सेवा, त्याचबरोबर शासनाने घालून दिलेले कायद्यांचे पालन करणे म्हणजे मी भारतीय आहे याचा अभिमान बाळगणे़ कारण निसर्ग संरक्षण व संवर्धन ही व्यक्तीसापेक्ष बाब आहे.
त्याकरिता अनुपालनाचा अंगीकार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या वसुंधरा दिनानिमित्ताने आपण एक निश्चय करू या, की आजपासून पुढील प्रत्येक दिवस निसर्गसंरक्षण, संवर्धन याकरिता तळमळीने काम करेऩ कारण निसर्गाची पूजा हीच वसुंधरेची पूजा, जी ठरेल उज्ज्वल भविष्याची संवर्धनाची दिशा.