फिर्यादी पोलीस निरीक्षकावरच केले गुन्हे दाखल
By Admin | Updated: July 7, 2016 02:32 IST2016-07-07T02:32:41+5:302016-07-07T02:32:41+5:30
सिटी कोतवाली पोलिसांचा अजब कारभार; साडेतीन कोटींच्या लॉटरीचा गोंधळात गोंधळ.
_ns.jpg)
फिर्यादी पोलीस निरीक्षकावरच केले गुन्हे दाखल
अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्याला साडेतीन कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर सदरची रक्कम देण्यास नकार देणार्या लॉटरी संचालकासह सिक्कीम सरकारविरुद्ध न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा मंगळवारी आदेश दिला. या आदेशामध्ये कोतवालीच्या तत्कालीन ठाणेदारांनी सरकारपक्षातर्फे फिर्याद दाखल करण्याचे नमूद असताना, सिटी कोतवाली पोलिसांनी आदेशाचे योग्य अवलोकन न करता फिर्यादी असलेल्या तत्कालीन ठाणेदारांवरच गुन्हे दाखल केल्याचा अजब-गजब प्रकार बुधवारी समोर आला. सिटी कोतवाली पोलिसांच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर प्रकरण नजरचुकीने झाल्याची सारवासारव करीत एक पत्र तयार करून ते न्यायालयामध्ये सादर केले आहे.
पोलीस कर्मचारी संजय व्यंकटराव चक्रनारायण यांनी ऑगस्ट २0१५ रोजी गांधी रोड येथील नितीन मुरलीधर गोयनका याच्या लॉटरी दुकानातून सिक्कीम सरकारच्या लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ४ ऑगस्ट २0१५ रोजी सोडत निघाल्यानंतर चक्रनारायण यांना ३ कोटी ४७ लाख रुपयांची लॉटरी लागली. त्यांनी लॉटरी संचालक नितीन गोयनका याला लॉटरी लागल्याचे सांगितले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर चक्रनारायण यांनी सिक्कीम सरकारच्या मुंबई येथील लॉटरीच्या मोठय़ा अधिकार्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, त्यांनी थेट राष्ट्रीय ग्राहक न्यायालय, दिल्ली आणि अकोला न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने फसवणुकीनुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाच्या आदेशाचे व्यवस्थित अवलोकन न करता ठाणा हजेरीवरील कर्मचार्याने सरकारतर्फे तत्कालीन कोतवाली ठाणेदार फिर्यादी असतानादेखील तत्कालीन पोलीस निरीक्षकांना प्रथम क्रमांकाचे आरोपी बनविले.
त्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या सिक्कीम सरकार, नितीन गोयनका व आणखी दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. ही चूक दुसर्याच दिवशी म्हणजे बुधवारी पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस वतरुळात खळबळ उडाली. पोलिसांनी चुकीची दुरुस्ती करण्यासाठी गोपनीय पद्धतीने न्यायालयात पत्र देऊन या प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणामुळे कोतवाली पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.