विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना स्वस्तात वीज देण्याचा प्रस्ताव?
By Admin | Updated: September 30, 2015 02:31 IST2015-09-30T02:31:27+5:302015-09-30T02:31:27+5:30
विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दराबाबत सवलती देण्यासाठी शिफारशी करण्याकरता ऊर्जा विभागाने आज एका समितीची स्थापना केली.

विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना स्वस्तात वीज देण्याचा प्रस्ताव?
मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दराबाबत सवलती देण्यासाठी शिफारशी करण्याकरता ऊर्जा विभागाने आज एका समितीची स्थापना केली. समितीला तीन महिन्यांत अहवाल देण्यास सांगितले आहे.
नागपूरचे विभागीय आयुक्त समितीचे अध्यक्ष असतील. अमरावती आणि औरंगाबादचे विभागीय आयुक्त सहअध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये अॅड.मधुकरराव किंमतकर, आर.बी.गोएंका, प्रशांत मेहता, राम भोगले, रघुनाथ कपाथे, वेदनारायण गुप्ता, चंदू बलदारा, ओमप्रकाश डागा आणि मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सदस्य सचिव असतील.
विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना इतर विभागातील उद्योगांच्या तुलनेत येणाऱ्या अडचणी, त्या विभागामध्ये उपलब्ध वीज व त्याचा दर तसेच या विभागांमध्ये उद्योग क्षेत्राचा जलद विकास होण्यासाठी तुलनात्मक अभ्यास ही समिती करेल. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वीज दराबाबत असलेल्या नियमनाच्या मर्यादेत या विभागातील उद्योगांना वीज दरात सवलत देताना त्याचा विपरित परिणाम इतर ग्राहकांच्या वीज दरावर आणि परवानाधारकांच्या महसुलावर कसा होणार नाही या बाबत समिती अभ्यास करेल.
विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक वीज ग्राहकांसाठीच्या प्रचलित वीज दरामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रोत्साहनपर आधारित योजना तयार करण्याचे काम ही समिती करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)