सक्षमीकरणाचा प्रस्ताव
By Admin | Updated: May 26, 2014 01:10 IST2014-05-26T01:10:43+5:302014-05-26T01:10:43+5:30
शहरातील वाढत्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन विभागाची चिंता वाढली आहे. त्यातच नागपूरसह मेट्रो रिजनमधील ९ तालुके व विभागातील ६ जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी विभागावर सोपविण्यात आली आहे.

सक्षमीकरणाचा प्रस्ताव
महापालिका : अग्निशमन समिती कामाला लागली नागपूर : शहरातील वाढत्या आगीच्या घटनांमुळे अग्निशमन विभागाची चिंता वाढली आहे. त्यातच नागपूरसह मेट्रो रिजनमधील ९ तालुके व विभागातील ६ जिल्ह्याच्या समन्वयाची जबाबदारी विभागावर सोपविण्यात आली आहे. या दृष्टीने अग्निशमन विभागाला सक्षम करण्याचा प्रस्ताव अग्निशमन समितीच्या विचाराधीन आहे. शहराची वाढती लोकसंख्या व आगीच्या घटना विचारात घेता अग्निशमन विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज करण्याची गरज असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रकाशित केले. याची दखल घेत अग्निशमन समिती विभागाच्या सक्षम करण्याच्या कामाला लागली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व बहुमजली इमारतीचा विचार करता विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची गरज आहे. सोबतच फायर स्टेशनची संख्या वाढवावी लागणार आहे. अग्निशमन विभागाची यंत्रणा आजही १९६५ सालच्या लोकसंख्येच्या आधारावर आहे. त्यावेळी ५ फायर स्टेशन व १९३ कर्मचार्यांची पदे मंजूर होती. गेल्या चार दशकात विभागातील कर्मचार्यांची संख्या वाढण्याऐवजी ती १४९ पर्यंंंत खाली आली आहे. शहरातील लोकसंख्या ३0 लाखांवर गेली असतानाही अद्यापही ५ फायर स्टेशन मंजूर असल्याची माहिती समितीचे सभापती किशोर डोरले यांनी दिली. लोकसंख्येचा विचार करता मनपाने ३ नवीन स्टेशन सुरू केले आहेत. शासनाकडे ५ नवीन स्टेशनचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. तो मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. वास्तविक अग्निशमन विभागाला सक्षम करण्याची जबाबदारी आयुक्तांची असते. राज्य शासनाने निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच दिलेले आहे. त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डोरले म्हणाले. (प्रतिनिधी)