शाळा, अंगणवाड्यांत अंडी देण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: September 30, 2015 02:46 IST2015-09-30T02:46:03+5:302015-09-30T02:46:03+5:30
देशातील १४ राज्यांनी माध्यान्ह पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यानंतर आता पशुसंवर्धन विभाग शाळा तसेच अंगणवाड्यांत इतर आहाराऐवजी उकडलेली अंडी देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणार आहे.

शाळा, अंगणवाड्यांत अंडी देण्याचा प्रस्ताव
सुधीर लंके, पुणे
देशातील १४ राज्यांनी माध्यान्ह पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यानंतर आता पशुसंवर्धन विभाग शाळा तसेच अंगणवाड्यांत इतर आहाराऐवजी उकडलेली अंडी देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविणार आहे.
९ आॅक्टोबरला ‘जागतिक अंडी दिवस’ आहे. यानिमित्ताने पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालयाने हा प्रस्ताव तयार केला आहे. आईच्या दुधानंतर अंड्यांत सर्वांत जास्त प्रथिने असतात. तसेच ९ अत्यावश्यक अमिनो अॅसिड्स असतात. अंड्यापासून सरासरी ६६ किलो कॅलरीज ऊर्जा मिळते व ती मानवी आहारात लागणाऱ्या सरासरी ऊर्जेच्या तीन टक्के असते. मात्र महाराष्ट्रात अंड्यांचा वापर खूप कमी होतो, असे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.
शाळांतील पोषण आहार योजनेत आठवड्यातून किमान तीन दिवस अंडी द्यावीत, तसेच अंगणवाड्यांतील मुले व गर्भवती मातांनाही अंडी दिली जावीत, असे या विभागाचे म्हणणे आहे. कुक्कटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित निर्णयामुळे गावपातळीवरच अंड्यांची बाजारपेठ मिळू शकेल, हा प्रस्तावामागील एक प्रमुख हेतू आहे.
अंड्यांत भेसळ करता येत नाही. शिवाय त्यात भरपूर पोषणमूल्ये आहेत. त्यामुळे ही योजना लाभार्थी व शासन दोघांसाठीही लाभकारी ठरू शकते. यावर्षी अंगणवाड्यांत प्रथमच उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. आठवड्यातून दोन दिवस अंडी दिली गेली. या दोन दिवसांत उपस्थितीत वाढ दिसली, असे विभागाचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय पोषण संस्थेच्या शिफारशींनुसार राज्यात प्रतिमाणसी वर्षाला १८० अंड्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ४३ अंडीच उपलब्ध आहेत. राज्याची अंड्यांची गरज भागविण्यासाठी तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयातील विस्तार विभागाने अंडी उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजनांवर विचार सुरू केला आहे.
------------
शाळा तसेच अंगणवाड्यांत अंडीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनासमोर मांडणार आहोत. कुपोषण कमी करण्यासाठी अंडी खाण्यास चालना देणे तसेच त्यातून रोजगारनिर्मिती करणे, हे उद्देश यामागे आहेत.
--------
जागतिक अंडी दिनानिमित्त पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांत एक लाख उकडलेली अंडी वाटप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त विश्वास भोसले यांनी सांगितले.