निवृत्तीच्या पूर्वसंध्येला पदोन्नती
By Admin | Updated: June 1, 2015 02:42 IST2015-06-01T02:42:45+5:302015-06-01T02:42:45+5:30
सेवानिवृत्तीला अवघा एक दिवस शिल्लक असताना सहा पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षक पदावर बढती दिली गेली. एक दिवसाच्या या बढती प्रकरणाने पोलीस महासंचालक

निवृत्तीच्या पूर्वसंध्येला पदोन्नती
राजेश निस्ताने, यवतमाळ
सेवानिवृत्तीला अवघा एक दिवस शिल्लक असताना सहा पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षक पदावर बढती दिली गेली. एक दिवसाच्या या बढती प्रकरणाने पोलीस महासंचालक कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
राज्यातील शेकडो पोलीस अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. फौजदार पदापासून अपर पोलीस अधीक्षकांपर्यंत हीच अवस्था आहे. या बढतीच्या प्रतीक्षेत तर कित्येक पोलीस अधिकारी सेवानिवृत्तही झाले आहेत. ३० मे रोजी सहा पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन पोलीस उपअधीक्षक बनविण्यात आले. त्यामध्ये खंडेराव विधाते (बृहन्मुंबई) देविदास सोनावणे (धुळे), पंढरीनाथ पाचपुते (नवी मुंबई), संपत कदम (दौंड पुणे), धर्मराज ओंबासे (नांदेड), रामचंद्र बरकडे (बृहन्मुंबई) यांचा समावेश आहे. विशेष असे, दुसऱ्याच दिवशी (३१ मे) रोजी हे सहाही अधिकारी सायंकाळी ५ वाजता सेवानिवृत्त झाले.
सन २०१५ मध्ये २१० पोलीस निरीक्षक सेवानिवृत होणार आहेत. त्यातील निरिक्षकांसह अन्य शेकडो पोलीस अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र यातील कित्येकांची सेवानिवृत्ती अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे त्यांनाही वेळेपूर्वी शासन बढती देणार की अवघ्या एक दिवसासाठी वरिष्ठ बनविणार याकडे लक्ष लागले आहे. महसूल व अन्य खात्यांमध्ये वेळेत बढती दिली जात असताना २४ तास राबणाऱ्या पोलिसांवरच हा अन्याय का, असा प्रश्न पोलीसांना पडला आहे.