राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
By Admin | Updated: December 1, 2014 00:47 IST2014-12-01T00:47:37+5:302014-12-01T00:47:37+5:30
८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून

राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
शरद जोशींची घोषणा: आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर
नागपूर : ८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या ज्या आंदोलनामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या उरात धडकी भरली होती त्या राजकीय पुढाऱ्यांना ‘गावबंदी’ आंदोलनाची घोषणा संघटनेचे नेते शरद जोशी यांनी येथे पुन्हा करून शेतकरी संघटना पुढच्या काळात आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले.
शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांपुढे जोशी यांनी आज आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर केला. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना आंदोलनासाठी मुंबई-दिल्ली-पुणे येथे जाणे शक्य नाही. त्यांना ते परवडतही नाही. त्यामुळे आपल्या गावात राहूनच पुढाऱ्यांना गावबंदी करा, त्यातून भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह एकाही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांना वगळू नका, असे जोशी यांनी निक्षून सांगितले.
८० च्या दशकात शेतकरी संघटनेच्या याच आंदोलनामुळे तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते. अनेक केंद्रीय मंत्र्यांना त्याचा फटका बसला होता. या आंदोलनाची माहिती कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे तेच आंदोलन नव्या जोमाने करण्याचे आवाहन जोशी यांनी केले. ‘गावबंदी’च्या जुन्याच अस्त्राद्वारे नव्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न संघटनेने सुुरू केला आहे.
मोदींनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे
संपूर्ण देशातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौरे करून काही देशांना आर्थिक मदतही करीत आहे. त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांना मदत करावी, असे जोशी यांनी आंदोलनापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात सरकार येऊन एक महिना झाला.
या काळात सरकारने अनेक निर्णय घेतले. त्याचप्रमाणे शेतमालाच्या भावासंदर्भात निर्णय घ्यावा. अल्पमतातील सरकार केव्हाही कोसळू शकते. त्याआधी त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास पुढच्या निवडणुकीत शेतकरी त्यांना मतदान करणार नाही, असे जोशी म्हणाले.(प्रतिनिधी)