विदर्भात औद्योगिक विकासाला गती
By Admin | Updated: December 21, 2014 00:13 IST2014-12-21T00:13:47+5:302014-12-21T00:13:47+5:30
हिवाळी अधिवेशनात विदर्भातील औद्योगिक विकासाच्या गंभीर मुद्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने मिहानसह नागपुरातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीकडे

विदर्भात औद्योगिक विकासाला गती
मुख्यमंत्र्यांच्या घोषणांमुळे उद्योजक उत्साही : मिहानला बुस्ट
नागपूर : हिवाळी अधिवेशनात विदर्भातील औद्योगिक विकासाच्या गंभीर मुद्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने मिहानसह नागपुरातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीकडे देशभरातील उद्योजकांचा कल वाढला आहे. सध्या नागपुरातील औद्योगिक क्षेत्राचे चित्र बदलत आहे. भारताच्या औद्योगिक नकाशावर नागपूरची वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये गणना होऊ लागल्याने उद्योजकांमध्ये उत्साह संचारला आहे.
सीएटचे भूमिपूजन
टायर निर्मितीच्या सीएट प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यात बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील जमीन हस्तांतरणाचे सोपास्कार पार पाडले आणि अधिवेशनातच भूमिपूजनही झाले. या प्रकल्पात विदर्भातील २८०० जणांना रोजगार मिळेल. शिवाय भूमिपूजनानंतर लगेचच स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. विस्तारीकरणात रोजगाराची द्वारे पुन्हा खुली होतील.
मिहानमधील विजेचा प्रश्न सुटला
मिहानमध्ये काही महिन्यांपासून प्रलंबित विजेचा पुरवठा आणि महत्त्वपूर्ण वीजदराचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातल्याने सुटला. त्यामुळे मिहानमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी स्थानिक, राज्य आणि देशभरातील उद्योजक उत्सुक आहेत. नामांकित उद्योजकांनी एमएडीसीकडे विचारणा केल्याची माहिती आहे. १५० ते २०० ते एकर जागेवर स्थानिक उद्योजकांनी फूड पार्क उभारण्याची तयारी चालविली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जागेची मागणीही केली आहे. एवढ्या मोठ्या जागेवर तब्बल १५० ते २०० जणांना आधुनिक उद्योजकांची उभारणी करण्याची संधी आहे.
‘मेक इन महाराष्ट्र’मुळे उद्योजक प्रभावित
महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या आवश्यक पायाभूत सुविधांसोबतच गतिमान निर्णयप्रकिया आणि उद्योगस्नेही वातावरणाची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच ‘मेक इन महाराष्ट्र’संदर्भात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याबाबत जे विधायक निर्णय घेतले, त्याबद्दल उपराजधानीतील बहुतांश उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अमेरिकन उद्योजक मिहानमध्ये गुंतवणुकीस उत्सुक
‘मेक इन महाराष्ट्र’मुळे अमेरिकन उद्योजक प्रभावित झाले. अमेरिकेचे महावाणिज्यदूत थॉमस वाडा यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील २२ प्रमुख उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची रामगिरीवर भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व सुविधायुक्त मिहानमध्ये आणि महाराष्ट्रात कुठेही उद्योग उभारण्याचे आवाहन त्यांना केले होते. चर्चेदरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही उद्योजकांना मिहानमध्ये गुंतवणुकीचे आवाहन केले आहे.
आयटी कंपन्यांमध्ये
अनेकांना संधी
मिहान-सेझ येथे परसेप्ट वेब सोल्युशन्स या सॉफ्टवेअर कंपनीचे रविवारी उद्घाटन झाले. विदर्भातील २५० तरुणांना रोजगाराच्या संधी आहेत. शिवाय मिहानमध्ये सुरू असलेल्या २२ कंपन्यांमध्ये ८ ते १० सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपन्या आहेत. तिथे अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच निर्यातही वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. मिहान-सेझमध्ये कार्यान्वित होणारी परसेप्ट ही आयटी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. भविष्यात जागा खरेदी करून विस्तारीकरणाचा मानस आहे. (प्रतिनिधी)